दयानंद लिपारे

देशभर लागू करण्यात आलेल्या करोना टाळेबंदीमुळे साखर उद्योगाचे तोंड कडू झाले आहे. साखरेचा साठा मोठय़ा प्रमाणात शिल्लक असताना आता टाळेबंदीमुळे विक्रीही मंदावल्यामुळे साखर उद्योगावरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

देशातील यंदाच्या (२०१९-२०) साखर हंगामाची सांगता नुकतीच झाली. यंदा या हंगामात साखरेचे २५० लाख टन उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पादन सुमारे ६० लाख टनाने कमी आहे.

असे असले तरी या उत्पादनात मागील वर्षीच्या १५० लाख टन शिल्लक साखरेची भर पडली आहे. यामुळे साखरेचा हा एकूण आकडा ४०० लाख टनांच्या घरात गेला आहे.

देशात साखरेचा खप २६० लाख टन आहे. यामुळे यंदा साखर उत्पादनात घट झाली असली तरी एकूण साठा पाहता देशातील १४० लाख टन साखर ही अतिरिक्त ठरली आहे.

अशा या अतिरिक्त साठय़ाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या करोनाने साखर उद्योगापुढे नवे संकट उभे केले आहे. या महामारीच्या नियंत्रणासाठी गेले तीन महिने सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे साखरेचा औद्योगिक वापर पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे देशांतर्गत साखरेच्या विक्रीत ८० टक्क्य़ांनी घट झाली आहे.

मागील हंगामातील शिल्लक साखर आणि नव्या हंगामाचे उत्पादन यामुळे कारखान्यांची गोदामे भरलेली असतानाच करोनाचे संकट अवतरल्याने या उद्योगाची मोठी कोंडी झाली आहे.

करोनामुळे गेले तीन महिने देशभर टाळेबंदी लागू आहे. याच्या परिणामस्वरूप बहुतांश उद्योग अद्यापही बंद आहेत. यामध्ये शीतपेय, मिठाई, चॉकलेट असे साखरेचा मोठा वापर करणारे उद्योगही थंड आहेत.

केवळ या तीन क्षेत्रात देशांतर्गत एकूण साठय़ापैकी ८० टक्के साखरेचा वापर होतो. मात्र टाळेबंदीने ही सर्व उलाढाल ठप्प झाली आहे.

लग्नसराई-अन्य कार्यक्रमांना लागलेला पायबंद, बंद हॉटेल व्यवसाय यामुळेही साखरेचा उठाव ठप्प आहे.

दुसरीकडे वाहतुकीतील अडथळे, बंदरांवरील मजुरांच्या तुटवडय़ामुळे निर्यातीलाही फटका बसला आहे.

या साऱ्यांच्या परिणामस्वरूप साखरविक्री कमालीची थंडावली आहे. यामुळे अगोदरच वाढीव साठय़ांनी त्रस्त झालेला हा उद्योग आता आणखी संकटात सापडला आहे.