विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड या साधारण विमा व्यवसायातील आघाडीच्या खासगी कंपनीने करोना संरक्षण विमा योजना सुरू केली आहे. हे विमाछत्र वैयक्तिक आणि फ्लोटर रूपात उपलब्ध आहे. या अंतर्गत ५० हजार ते ५ लाख दरम्यान करोना उपचारांसाठी संरक्षण उपलब्ध आहे. विमा योजनेचा कालावधी साडेतीन महिने ते साडे नऊ महिने असून १८ ते ६५ वय असलेल्या व्यक्तींचा समावेश लाभार्थ्यांमध्ये होऊ शकेल. विमा योजना सुरू झाल्यावर प्रतीक्षा कालावधी १५ दिवस आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी १५ दिवस आणि रुग्णालयानंतर ३० दिवासांपर्यंतच्या उपचारांच्या खर्चाला या योजनेंतर्गत संरक्षण मिळणार आहे.

एचडीएफसी एर्गो या देशातील खसगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या साधारण विमा कंपनीने  ‘कोरोना कवच’ विमा योजनेची घोषणा केली आहे.  हे विमाछत्र कोविड-१९ च्या उपचारांचा भाग म्हणून रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास येणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण देणार आहे.  सरकारने मान्यता दिलेल्या आरोग्य निदान केंद्रांमध्ये कोविड चाचणी सकारात्मक आलेले विमाधारक रुग्ण भरपाई मिळवण्यास पात्र ठरतील. याशिवाय कोविड-१९ वरील उपचारांसोबतच अन्य विकारांच्या (को-मॉर्बिडिटीज) उपचारांच्या खर्चाची भरपाईही या विमा योजनेंतर्गत दिली जाणार आहे.

फ्यूचर जनरालीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य विमा योजनेत धारकाला कोविड-१९ ची लागण झाली तर विम्याची एकरकमी रक्कम मिळते. परंतु, हे विमाछत्र घेताना धारकाने त्याचा प्रवासाचा इतिहास नमूद करणे बंधनकारक आहे. नॉव्हेल करोना विषाणूशी संबंधित वैद्यकीय पार्श्वभूमी नसण्याची अट आहे.

स्टार हेल्थ इन्श्युरन्सच्या स्टार नॉव्हेल करोना विषाणू विमाछत्र योजनेअंतर्गत कोविड-१९ असलेल्या आणि तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना आरोग्य विमा आहे. या योजनेचा प्रतीक्षा कालावधी १६ दिवसांचा आहे. ही योजना १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. त्याचप्रमाणे ३ ते २५ या वयोगटातील (अवलंबित) मुलांना कोणत्याही एका पालकासमवेत या योजनेअंतर्गत संरक्षण आहे.

निश्चित लाभ योजनेमध्ये विशिष्ट आजारासाठी निश्चित विमाछत्र मिळत असले तरी योजनेअंतर्गत संरक्षण मिळविण्यासोबतच नुकसानभरपाईवर आधारित आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. अशा योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करता येते आणि यात सर्व प्रकारच्या आजारांच्या वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळते. सर्वसमावेशक आणि प्रत्येक आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त रकमेच्या आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करायला हवी.

– अमित छाब्रा, आरोग्य व्यवसाय विभागप्रमुख, पॉलिसीबाजार.कॉम