रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फ्युएल फॉर इंडिया २०२० या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भारतीतल डिजिटल मंचांच्या प्रगतीवर चर्चा केली. या वेळी मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमाला संबोधितही केलं. भारतातील अनेक कंपन्या आणि संघटना डिजिटल इनक्युजनवर त्वरित काम करत असल्याचं ते म्हणाले. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये भारतातील युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तसंच भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमेला दिलं. तसंच यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणुकीसाठी मार्क झुकरबर्ग यांचे आभारही मानले. “सध्या देशात डिजिटल क्रांतीच्या शक्यतांवर व्यापक प्रमाणात चर्चा होत आहेत. संकटाच्या काळातच नव्या शक्यतांच्या रस्ता आपल्याला दिसतो. देशात करोनाच्या संकटामुळे नव्या शक्यतांचा मार्ग उघडला आहे,” असंही अंबानी म्हणाले.

करोना महासाथीच्या संकटात देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाली आहे. फेसबुकची जिओमधील गुंतवणूक ही भारतातील सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. फेसबुक आणि जिओ एकत्र येऊन पुढील कालावधीत छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणार आहेत. छोट्या व्यवसायांसाठी व्हॅल्यू क्रिएशन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. “सध्या देशात वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम या योजना यशस्वी होताना दिसत आहेत. देशातील विकास यापुढेही कायम राहणार आहे,” असंही अंबानी म्हणाले.

तंत्रज्ञानाची मोलाची भूमिका – झुकरबर्ग

“डिजिटल इंडियामुळे अनेक विकासासाचे मार्ग निर्माण झाले. भारतातील व्हॉट्सअॅप बिझनेस युझर हा १.५ कोटींच्या पुढे गेला आहे, भारतातील फायनॅन्शिअल इन्क्लुजनमध्ये मोठा ट्रेंड दिसून येत आहे. करोनाच्या कालावधीत यावर्षी तंत्रज्ञानाचं महत्त्व सिद्ध झालं आहे. लोकांनी एकमेंकांच्या संपर्कात राहण्यासाठी तंत्रज्ञानानं मोलाची भूमिका बजावली आहे. लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठीही तंत्रज्ञानाची मदत झाली आहे,” असं मत यावेळी मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केलं.

“आम्हाला फेसबुकची खरी कहाणी भारतातीयांसमोर आणायची आहे. यामुळे लोकांना आमच्या मंचाचा वापर करणाऱ्या लोकांद्वारे आणि संस्थांद्वारे आम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहोत हे समजण्यास मदत होईल,” असं मत फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी यावेळी व्यक्त केलं.