सरकारला निर्गुतवणूक महसुलात १०,००० कोटींची भर अपेक्षित

केंद्र सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘सीपीएसई एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)’च्या सातव्या टप्पा चालू महिनाअखेर लोकांना गुंतवणुकीसाठी खुला करून, त्यायोगे सुमारे १०,००० कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. हा निधी सरकारने चालू वर्षांसाठी निर्धारित केलेल्या १.०५ लाख कोटी रुपयांच्या निर्गुतवणूक महसुलातील महत्त्वाची भर ठरेल.

निप्पॉन लाइफ इंडिया अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडून या सीपीएसई ईटीएफचे सरकारच्या वतीने व्यवस्थापन पाहिले जात आहे. निप्पॉन लाइफ इंडियाने प्रस्तावित सातव्या टप्प्यातील गुंतवणुकीसाठी बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे योजनेसंबंधी माहिती-दस्तऐवज दाखलही केला आहे.

फंडातून परतावा उत्साहवर्धक नसला तरी यापूर्वीच्या या फंडाच्या सहा टप्प्यांना गुंतवणूकदारांकडून चांगला  प्रतिसाद मिळविला आहे आणि सरकारने त्यायोगे आजवर ४९,५०० कोटी रुपये उभेही केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी, एनटीपीसी, कोल इंडिया, इंडियन ऑइल, आरईसी, पीएफसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ऑइल इंडिया, एनबीसीसी इंडिया, एनएलसी इंडिया आणि एसजेव्हीएन अशा ११ कंपन्यांच्या समभागांचा ‘सीपीएसई ईटीएफ’मधून माग घेतला जातो.