पण देयके थकण्याच्या प्रमाणातही वाढ!

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याच काळात कार्डधारकांद्वारे एकत्रितपणे बँकांची देणी थकविण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. क्रेडिट कार्ड देयके थकण्याच्या प्रमाणात तब्बल ३८.७ टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आधीच कोटय़वधींची कर्जे बुडीत खात्यात गेलेल्या बँकांची चिंता आणखी वाढली आहे.

सप्टेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी ५९,९०० कोटी रुपयांची बँकांची देणी थकविली आहेत. सप्टेंबर २०१६ पर्यंत हा आकडा ४३,२०० कोटी रुपये इतका होता. रिझव्‍‌र्ह बँकेने ताज्या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड देयकाची रक्कम थकवणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ७७.७४ टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये थकीत देयकाची रक्कम ३३,७०० कोटी रुपये इतकी होती. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये ती थेट ५९,९०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात चलन तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांनी क्रेडिट कार्डच्या वापराला पसंती दिली. याशिवाय अनेकांनी क्रेडिट कार्डसाठी बँकांकडे अर्ज केले. त्यामुळे ऑगस्ट २०१७ पर्यंत वापरात असलेल्या क्रेडिट कार्ड्सची संख्या ३ कोटी २६ लाख ५० हजारांवर गेली. ऑगस्ट २०१६ मध्ये हा आकडा २ कोटी ६३ लाख ९० हजार इतका होता.

क्रेडिट कार्डवरील थकीत देय रकमेवर बँकांकडून दर महिन्याला किमान १.५ टक्के ते कमाल ३.४९ टक्के व्याज (म्हणजे वर्षांला कमाल ४१.८८ टक्के) आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डधारकांनी थकविलेल्या ५९,९०० कोटी रुपयांवर बँकांना २०९० कोटी रुपये व्याज मिळू शकते. याशिवाय बँकांकडून या रकमेवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. अनेकदा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांकडून देयकाची रक्कम थकविली जात असल्याने व्याजाचा दर अधिक असल्याची माहिती एका बँक अधिकाऱ्याने दिली.