चालू आर्थिक वर्षांत प्रथमच बँकांच्या कर्जवितरणातील वाढ जेमतेम एक-अंकी म्हणजे ८.७९ टक्के वाढ नोंदवू शकली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, २७ सप्टेंबरला समाप्त पंधरवडय़ात देशातील सर्व बँकांचे कर्ज वितरण ९७.७१ लाख कोटी रुपये होते, जे त्या आधीच्या पंधरवडय़ात ८९.८२ लाख कोटी रुपये होते.

ऑगस्टमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने सलग चौथी आणि अपारंपरिक वळण घेत रेपो दरात ०.३५ टक्के कपात केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑगस्ट महिन्यात बँकप्रमुखांची बैठक घेऊन कर्ज वितरणाला गती देण्याचे आवाहन केले. २३ ऑगस्टला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन स्वरूपात, वित्तीय व्यवस्थेला चालना देणाऱ्या काही घोषणा केल्या. मात्र त्यानंतर बँकांच्या पतवाढीला चालना मिळण्याऐवजी, प्रत्यक्षात त्याने वर्षांतील नीचांकी वाढ नोंदविल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेची आकडेवारी दर्शविते. ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपलेल्या पंधरवडय़ात मात्र बँकांनी १०.२६ टक्के वाढीने ९७.०१ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले होते.

उल्लेखनीय म्हणजे २७ सप्टेंबपर्यंतच्या पंधरवडय़ात बँकांच्या ठेवींमधील वाढही मंदावून ती ९.३८ टक्के अशा एक अंकी स्तरावर घसरली आहे. बँकांच्या ठेवी १२९.०६ लाख कोटी रुपये इतक्या असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेची आकडेवारी सांगते. आधीच्या म्हणजे १३ सप्टेंबपर्यंतच्या पंधरवडय़ात बँकांच्या एकूण ठेवी १०.०२ टक्क्यांनी वाढल्या होत्या.

बँकांकडून होणारे वैयक्तिक कर्जाचे वितरण ऑगस्ट २०१९ अखेर १५.६ टक्के दराने वाढले आहे, जे गेल्या वर्षी ऑगस्टअखेर १८.२ टक्के दराने वाढले होते. यंदा ते काहीसे घसरले असले, तरी दोन अंकी वाढीचा दर असलेला हा बँकांचा एकमेव कर्ज प्रकार आहे.

बिगरखाद्य अर्थात कृषीबाह्य़ कर्ज वितरण ऑगस्ट २०१९ अखेर वार्षिक ९.८ टक्के दराने वाढले आहे. वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०१८ अखेर ते १२.४ टक्के दराने वाढले होते. कृषी आणि पूरक क्षेत्राला कर्ज वितरणातील वाढ ऑगस्टअखेर ६.८ टक्के जी गेल्या वर्षी याच महिनाअखेर ६.६ टक्के होती. सेवा क्षेत्राला कर्ज वितरण गेल्या वर्षी ऑगस्टअखेर २६.७ टक्के दराने वाढले होते, यंदा त्यातील वाढीचा टक्का निम्म्यावर म्हणजे १३.३ टक्के असा आहे. उद्योग क्षेत्राला कर्जवितरण गेल्या वर्षी ऑगस्टअखेर अवघे १.९ टक्क्यांवर होते, त्या पातळीवरून ते यंदा दुप्पट म्हणजे ३.९ टक्के वाढीच्या दरावर गेले आहे.