कांचनगौरी महिला पतपेढी अध्यक्षा ऊर्मिला प्रभुघाटे यांची माहिती; पतपेढीत १४७ कोटींच्या ठेवी

डोंबिवली : मागील साडे चार वर्षांच्या कालावधीत देशातील आर्थिक स्थित्यंतरांमुळे बँकांमधील ठेवी वरील व्याजदर कमी झाले. अन्य वित्तीय गुंतवणुकीतील व्याजदरही घटल्याने अस्वस्थ ग्राहक मोठय़ा संख्येने आकर्षक व्याजदर देणाऱ्या पतपेढय़ांकडे आकृष्ट झाला आहे. डोंबिवलीतील कांचनगौरी महिला सहकारी पतपेढीने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. गेल्या वर्षभरात ‘कांचनगौरी’चे सदस्य ९२७ ने वाढले. ‘कांचनगौरी’च्या एकूण ठेवी १४७ कोटी रुपयांच्या झाल्या आहेत, अशी माहिती कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी अध्यक्षा उर्मिला प्रभुघाटे यांनी दिली.

‘पतपेढय़ांची वाटचाल’ विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. चिटणीस संगीता ताम्हनकर, ‘आयटी’ संचालक संगीता पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना भावे, व्यवस्थापक विश्वास बिडकर उपस्थित होते.

३५ वर्षांपूर्वी महिलांनी महिलांच्या उत्कर्षांसाठी कांचनगौरी पतपेढीची मुहूर्तमेढ रोवली. आज यशस्वीपणे पतपेढीची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. डिजिटल पध्दतीने पतपेढीच्या १२ शाखांचा कारभार ६८ महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालविला जातो. महाराष्ट्रात शाखा विस्ताराला पतपेढीला मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण गरजूंना शेती, व्यवसाय करण्यासाठी कर्ज देऊन त्यांना स्वयंपूर्ण करण्यावर पतपेढीचा भर आहे. कल्याण तालुक्यातील घोटसई, निळजे गावांमध्ये शाखा सुरू केल्यात. ९३ कोटीची कर्जवाटप केलीत, असे प्रभुघाटे यांनी सांगितले.

पतपेढय़ांसमोरील अडचणी संदर्भात प्रभुघाटे यांनी सांगितले की, अनेक महिला सदस्यांना नोकरी, व्यवसाय नसल्याने कर्ज देताना त्यांना अडचणी यायच्या. यासाठी पतपेढीच्या उपविधीमध्ये बदल करण्यात आले. पुरुषांना नाममात्र सभासद करत महिलांना कर्ज देण्याची व्यवस्था केली. रेरा कायदा आल्यानंतर काहींनी कर्ज घेतले; मात्र हप्ते भरताना त्यांच्याकडून टाळाटाळ होऊ लागली. कर्ज देताना पतपेढी कर्मचाऱ्यांना त्या कर्जाचे पालकत्व दिले जाते. त्या ग्राहकाने वेळेवर कर्जहप्ता फेडला का. तो वेळेवर कर्ज हप्ते फेडतो की नाही याची जबाबदारी कर्मचाऱ्यावर असल्याने कर्ज हप्ते बुडविण्यात ग्राहक टाळाटाळ करत नाही. आठ वर्षांपूर्वी ९७ वी घटना दुरुस्ती झाली. त्यानुसार देशात एकच सहकार कायदा असावा म्हणून तरतूद झाली.

या कायद्याने यापूर्वी महिला, पुरूष असे वर्गीकरण पतपेढय़ांमध्ये होते ते रद्द झाले. यापूर्वी पतपेढीने ज्या पुरूष सदस्यांना नाममात्र दराने सदस्य केले. त्यांना भागधारक करणे पतपेढीवर बंधनकारक करण्यात आले.

कोकणातील पाच जिल्ह्य़ातील ९० पतसंस्थांचे ‘कोकण महिला पतसंस्था फेडरेशन’ स्थापन करुन त्याचे पालकत्व कांचनगौरीने घेतले. पतपेढय़ांचे प्रश्न या माध्यमातून शासन स्तरावर मांडण्यात येतात.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू, आरोग्य शिबीर आदी सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.