मुक्त आणि स्पर्धाशील बाजारपेठ असे भांडवलशाहीच आदर्शवत चित्र धूसर होत असून, संकोचत चाललेला संधींचा अवकाश पाहता या व्यवस्थेपुढे अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी मंगळवारी केले.

नोकरकपात, अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहापासून वाढती वंचितता, त्यातून उद्भवणारे सामाजिक प्रश्न, त्याचप्रमाणे परराष्ट्र व्यापारातही समान संधींचा अभाव यामुळे एकीकडे डाव्या तर दुसरीकडे टोकाच्या उजव्या विचारसरणींची लोकप्रियता बळावत आहे, यावर राजन यांनी बोट ठेवले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राजन यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजन हे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी ध्वनी-चित्रमुद्रित संदेशांद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते.

प्रतिष्ठानचा यापूर्वीचा पुरस्कार टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा, इन्फोसिसचे सह संस्थापक नंदन निलेकणी, ज्येष्ठ संगीतज्ज्ञ झुबिन मेहता आदींना प्रदान करण्यात आला आहे.

राजन यांनी आपल्या नव्या ‘द थर्ड पिलर’ या पुस्तकाचा संदर्भ देताना, विद्यमान भांडवली व्यवस्थेत एकीकडे बाजारपेठ विस्तारली आहे, सरकार आणि नियमन यंत्रणाही सशक्त बनली आहे, परंतु तिसरा स्तंभ अर्थात जनसमाज हा अधिकाधिक संकुचित बनत चालला आहे. जागतिक व्यापार आणि जागतिक माहिती-संपर्क क्रांतीचे आक्रमणे सोसत असलेल्या समाजाला शिक्षणव्यवस्थेचा ऱ्हास, गुन्हेगारीकरण, बेरोजगारी व वाढत्या सामाजिक अनारोग्याचे आघातही सोसावे लागत आहेत. ज्यावर लवकरात लवकर उपाय शोधला गेला नाही तर उद्भवणारे अरिष्ट हे २००८ सालच्या संकटापेक्षाही भयानक असेल, असे राजन यांनी भाकीत केले.