इन्फोसिस या प्रसिद्ध आयटी कंपनीत कामाला असलेल्या कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी घटली आहे. २०१४-१५ मध्ये ही संख्या ११३ इतकी होती. तर २०१५-१६ मध्ये या संख्येत घट होऊन ती ५४ वर आली आहे. गेल्या वर्षी कंपनीने त्यांच्या सर्व कर्माचाऱ्यांना भरघोस बोनस दिला होता, ज्यामुळे त्यावर्षी कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मानणे आहे. २०१४-१५ या वर्षामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असेलेली उदासीनतेची दखल घेत कंपनीने कर्मचाऱ्यांना प्रमोशन आणि बोनस देण्यास सुरुवात केली. या निर्णयाचा कंपनीला चांगला फायदादेखील झाला होता. इन्फोसिसमधील २६० कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार ६० लाख रुपये इतका आहे.
कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार २०१६-१७ आर्थिक वर्षात कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी झाल्याचे पाहायला मिळू शकते. सहा कोट्याधीश कर्मचारी इन्फोसिसमधून बाहेर पडल्याचा हा परिणाम असणार आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये राजीव बंसल हे सुपरिचीत नाव आहे. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी असलेल्या राजीव यांचा पगार दहा कोटी इतका होता. त्याचबरोबर वार्षिक ६० लाख रुपये पगार असणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांनीही इन्फोसिस सोडली आहे. इन्फोसिसचे सध्याचे सीईओ विशाल सिक्का यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये ४८.७३ कोटी रुपये इतके उत्पन्न पागाराच्या रुपाने प्राप्त केले. कंपनीत १.९४ लाख कर्मचारी काम करतात.