महागाईशी दोन हात करताना कठोर धोरण स्वीकारणारे डॉ. डी. सुब्बाराव मंगळवारी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या तिमाही पतधोरण आढाव्यात, भारतीय चलनातील तीव्र अवमूल्यन पाहता रेपोदर कमी करतील, अशी खुद्द अर्थक्षेत्रातील धुरिणांनाही अपेक्षा नाही. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील शेवटच्या पतधोरणात रेपोदर ७.२५%, तर रोख राखीव प्रमाण ४% ठेवूनच सुब्बराव हे रिझव्‍‌र्ह बँकेचा निरोप घेतील, असेच अधिकांना वाटते.
सरकारने सुब्बाराव यांना मुदतवाढ दिली नाही तर सुब्बाराव यांचा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यकाल ४ सप्टेंबरला संपुष्टात येईल. तूर्त तरी त्यांच्या मुदतवाढीचे संकेत सरकारी पातळीवरून दिले गेलेले नाहीत. उलट नवा उमेदवार कोण असू शकतो, याची चाचपणी अर्थमंत्रालयात सुरू झाली आहे.
वृत्तसंस्थेने केलेल्या प्रमुख अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणातून व्याजदर ‘जैसे थे’चाच १०० टक्के कौल पुढे आला आहे. या सर्वेक्षणात एकूण ५२ बँकांच्या गुंतवणूक विभागप्रमुख व अर्थतज्ज्ञ यांची मते आजमाविण्यात आली. ‘अर्थव्यवस्थेतील ठरावीक एका गटाकडे खूप मोठी तरलता होती. या तरलतेचा दुरुपयोग देशाच्या चलनावर सट्टेबाजी करण्यासाठी होत होता. हा दुरुपयोग थांबविण्यासाठी ही तरलता शोषून घेणे आवश्यकच होते,’ असे मतप्रदर्शन ‘केअर’ या पतमापन संस्थेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ मदन सबनविस यांनी या सर्वेक्षणादरम्यान केले. ‘रिझव्‍‌र्ह बँकेचे उद्दिष्ट उद्योग क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा व्हावा, जेणे करून मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा विकासाच्या रस्त्यावर वेग धरू शकेल,’ असेही ते म्हणाले. रेपोदर तसाच ठेवून बँकदर वाढविण्यात आला, कारण रिझव्‍‌र्ह बँकेला अल्प मुदतीचा व्याजदर वर जाणे अपेक्षित होते. त्यामुळे अल्प मुदतीसाठी कर्ज महागले, परंतु दोन वर्षे मुदतीहून अधिक कर्जे फारसे वाढणार नाहीत याची काळजी घेतली गेली.
आशियातील तिसऱ्या मोठय़ा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर गेल्या वर्षांत पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. चालू आíथक वर्षांत तो ५.२५ – ५.५०%  राहणे अपेक्षित आहे. ‘प्रदीर्घ काळ अर्थव्यवस्थेला पुरेशा रोखतेपासून वंचित ठेवणे परवडणारे ठरणार नाही,’ असे मत स्टेट बँकेतून नुकत्याच निवृत्त झालेल्या अर्थतज्ज्ञ डॉ. वृंदा जहागीरदार यांनी व्यक्त केले. महागाईचा जून महिन्यासाठीचा दर ४.८६% असल्यामुळे रेपोदरात पाव टक्क्याची कपात व तितकीच रोख राखीव प्रमाणात कपात एरव्ही अपेक्षित होती. परंतु चलनाला स्थिरता लाभल्यावर लवकरच रिझव्‍‌र्ह बँक दर पूर्ववत करेल. तर हा काळ एक महिन्यापेक्षा जास्त असणार नाही, अशी आशा ९५% सर्वेक्षणाथीर्ंनी व्यक्त केली आहे. रुपयातील घसरण रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सध्या अवलंबलेले उपाय हे तात्पुरते उपाय असतील. लवकरच व्याजदर पूर्वीच्या पातळींवर येतील, अशी आशा  व्यक्त करीत बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. एस. मुंद्रा यांनी, नजीकच्या काळात ठेवीचे दर व कर्जावरचे व्याज वाढविण्याचा विचार नसल्याचे सांगितले. अर्थव्यवस्थेतील रोकड व व्याजदर यांचा विचार करून भविष्यात बँक आपल्या दरात योग्य ते बदल करेल, असे बँक ऑफ इंडियानेगी स्पष्ट केले आहे.
* रुपयाच्या स्थिरतेवर रोख!
व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यासह मंगळवारच्या तिमाही पतधोरणात रुपयाच्या स्थिरतेच्या दृष्टीने अधिक पावले उचलली जातील, असे संकेत रिझव्‍‌र्ह बँकेने आज सादर केलेल्या पतधोरण विकास आढाव्यात दिले. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण थोपविणे असून स्थानिक चलन अवमूल्यनाला सर्वाधिक जबाबदार असलेल्या चालू खात्यातील तूट रोखणेही महत्त्वाचे आहे, असे पतधोरणाच्या पूर्वसंध्येला जारी केलेल्या आढाव्यात नमूद करण्यात आले आहे. चलन स्थिरतेमुळे अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल आणि बचत तसेच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार मार्च २०१४ अखेर डॉलरच्या तुलनेत रुपया ५९.५० पर्यंत स्थिरावेल. चालू खात्यातील तूटही वर्षअखेर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या गेल्या वर्षांतील ४.८ टक्क्यांच्या तुलनेत कमी राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

* स्टेट बँकेचे चौधरी पुन्हा संतापले
बँकिंग नियंत्रक रिझव्‍‌र्ह बँकेवर स्टेट बँकेच्या अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी आज पुन्हा आगपाखड केली  रुपयाच्या घसरणीला अटकावासाठी योजलेल्या उपायांचा फार काही परिणाम होणार नाही, असे मत मांडणाऱ्या यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या या उपाययोजनेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा ताजा हल्ला केला आहे. बँकांच्या ठेवीतील हिस्सा स्वरूपात रिझव्‍‌र्ह बँकेकडे रोख राखीव प्रमाण (सीआरआर) म्हणून ठेवण्यात येणाऱ्या कोटय़वधी रुपयांवर व्याज मिळायला हवे, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या चौधरी यांनी यंदा व्याजदरात वाढ होईल, असे पुन्हा अन्य बँकतज्ज्ञांपेक्षा निराळे मत मांडले आहे.