प्रमुख तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादन कमी न करण्याबाबतची पुनघरेषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सोमवारी ६० डॉलर प्रति पिंपपर्यंत खाली येताना पाच वर्षांच्या नव्या तळात विसावले. त्यामुळे सध्या तेलाचे दर जुलै २००९ नंतरचे किमान दर आहेत.
जागतिक स्तरावर मुबलक इंधन पुरवठा असला तरी आखाती भागातील देशांनी तेल उत्पादन कमी न करण्याचा पुनरुच्चार केला आहे. उत्पादन कमी केल्यास किमतीवर फारच कमी परिणाम होईल, असे या देशांना वाटत आहे. उलट तसे केल्यास बाजारपेठेतील या देशांचा हिस्सा कमी होईल, अशी भीतीही त्यांना वाटत आहे.
उत्तर अमेरिका तेलाबाबत समृद्ध होत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून तेलाच्या किमतींत मोठी घट पाहायला मिळत आहे.
बार्कलेज या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने २०१५च्या पहिल्या अर्धवार्षिकात कच्च्या तेलाचे दर जागतिक स्तरावर प्रति पिंप ६७ डॉलपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली आहे.