खनिज तेल २०१६च्या उच्चांकावर
लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराने २०१६ मधील नवा वरचा टप्पा गाठला असून बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात काळे सोने प्रति पिंप ५२ डॉलपर्यंत पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरचे घसरते मूल्य आणि त्यातच नायजेरियामधील कमी इंधन पुरवठय़ावरून निर्माण झालेली चिंता यामुळे तेलदराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. खनिज तेल दर आता ऑक्टोबर २०१५ नंतरच्या वरच्या टप्प्यावर आहेत, तर त्याचा ५२ डॉलर प्रति पिंपाचा ताजा व्यवहार हा २०१६ मधील सर्वोच्च स्तरावरील आहे.

रुपया महिन्याच्या सर्वोच्च स्थानी
मुंबई : डॉलरच्या तुलनेत सातत्यातील पाचवी वाढ नोंदविताना रुपया बुधवारी महिन्याभरातील वरच्या टप्प्यावर पोहोचला. एकाच व्यवहारात १२ पैशांची झेप घेत स्थानिक चलन आठवडय़ातील तिसऱ्या व्यवहारात ६६.६५ पर्यंत भक्कम बनले. मान्सूनची दखल घेत भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा ओघही रुपयाला बळकटी मिळून देण्यास कारणीभूत ठरला. गेल्या पाच व्यवहारांत मिळून ८० पैशांची वाढ राखणारा रुपया यापूर्वी १२ मे २०१६ रोजी वरच्या टप्प्यावर होता.