आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप १०० डॉलरवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यादवीग्रस्त लिबियातून पुरवठा सुरळीत होण्याच्या संकेताने प्रमुख वायदा बाजारांमध्ये तेलाचे गेल्या दोन दिवसांपासून ओसरू लागले आहेत. इंधन आयातीवर मदार असणाऱ्या आणि त्यासाठी विदेशी चलन खर्ची घालाव्या लागणाऱ्या भारतासाठी रुपयाच्या मूल्यात स्थिरतेसह तेलातील नरमाई हा शुभसंकेतच ठरतो.
लिबियात हिंसक आंदोलन थंडावत असल्याने, तेथील सर्वात मोठा तेल साठा असलेल्या अल सेहरामधून नॅशनल ऑइल कॉर्प या तेल कंपनीचे दोन महिन्यांपासून बंद पडलेले उत्पादन लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी गुरुवारी नायमेक्स (न्यू यॉर्क मर्केन्टाइल एक्स्चेंज) आणि ब्रेन्ट क्रूड या जागतिक स्तरावर तेलाच्या किमती निश्चित करणाऱ्या दोन्ही व्यवहारांत तेलाच्या सौद्यांमध्ये तब्बल १.५ टक्क्य़ांची घट दिसून आली. शुक्रवारी सकाळी आशियाई बाजारांमध्ये झालेल्या वायदा व्यवहारातही
ब्रेन्ट क्रूडला १०७ डॉलर रुपये प्रति िपप मोजले जात होते, तर नायमेक्स क्रूडचा भाव प्रति पिंप ९५.६० डॉलरच्या घरात मोजला गेला.
अमेरिकन अर्थव्यवस्था सावरत असल्याचे द्योतक म्हणून गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर किमान पातळीवर येत आहेत. डॉलरच्या अलीकडच्या सशक्ततेचाही तेलाच्या व्यवहारांवर नकारात्मक परिणाम होत आहे. तथापि सरलेल्या २०१३ सालात नायमेक्स तेलाच्या किमतींनी वार्षिक ६ टक्क्य़ांची म्हणजे २०१० नंतरची सर्वात मोठी वार्षिक वाढ दाखविली.