आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमालीच्या खाली आल्या असून गुरुवारी उशिरा तर ते प्रति पिंप ८० डॉलरपेक्षाही कमी स्तरावर आले. एकाच व्यवहारात कच्चे तेल तब्बल ४.४ टक्क्यांनी घसरले असून बाजार बंद झाला तेव्हा भारताकडून प्रामुख्याने आयात होणाऱ्या ब्रेन्ट क्रूडला ७७.५२ डॉलरचा भाव मिळाला. काळे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या इंधनाची ही गेल्या चार वर्षांतील किमान पातळी आहे.
ब्रेन्ट क्रूड हा आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक व्यवहार होणारे कच्चे तेल मेपासूनच सातत्याने घसरत आहेत. तर जूनपासून आतापर्यंतची तेल दर घसरण ही तब्बल ३० टक्क्यांची आहे. कच्चे तेल त्या आधी प्रति पिंप ११५ डॉलरवर होते.
अमेरिकी कच्चे तेल (नायमेक्स) देखील चार वर्षांच्या किमान स्तरावर येताना त्यात प्रति पिंप २.५७ डॉलर घसरण होत हे दर ७४.२८ डॉलरवर आले आहेत. न्यूयॉर्क बाजारपेठेत नोंदली गेलेली कच्च्या तेलाची किंमत ही २१ सप्टेंबर २०१० नंतरची सर्वात कमी किंमत आहे. येथे डिसेंबरमधील वायदा व्यवहाराची नोंदही कमी दरांवरच झाली आहे.
‘ऊर्जा माहिती प्रशासना’मार्फत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचा इंधनसाठा १७.४० कोटी पिंपने कमी झाला आहे. तर गेल्या आठवडय़ात तो १७ लाख पिंपने कमी होऊन २२.५ अब्ज पिंप झाला आहे.
कच्च्या तेलाबाबत जागतिक महासत्तेच्या स्वावलंबनात गेल्या काही महिन्यांतील वाढीचा परिणाम म्हणून प्रमुख तेल उत्पादक आखाती देशांनी त्यांचे कच्चे तेल दर कमी करण्यात झाला आहे. जागतिक तेल निर्यातीत या तेल उत्पादक देशांचा हिस्सा ४० टक्क्यांहून अधिक आहे. या देशांनी तेलाचे दर कमी केले असले तरी उत्पादनात मात्र कोणतीही कपात केलेली नाही. प्रमुख १२ तेल उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेची आढावा बैठक नोव्हेंबरच्या अखेरीस होणार आहे. उत्पादन कपात व पुरवठा मर्यादित ठेवून उत्पन्न वाढविण्याचा मार्ग या बैठकीत अनुसरला जाऊ शकतो. यामुळे तेलाचे दर पुन्हा स्थिरावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तेल उत्पादक देशांमध्ये किंमत युद्ध असल्याच्या वृत्ताला प्रमुख देश सौदी अरबने नकार दिला आहे. त्यामुळेच इंधन उत्पादन कायम ठेवण्याचे धोरण राखले जाईल, असेही या देशाने स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेला तूर्त अतिरिक्त इंधनपुरवठा करण्यात येत नाही; तसेच त्यात कोणतीही कपातदेखील अद्याप करण्यात आलेली नाही, असेही आखाती तेल उत्पादक देशांनी स्पष्ट केले आहे.
हेही न परवडणारेच!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप ८० डॉलरच्या खाली येणे भारतासाठी शुभसूचकच आहे. आपण सध्या गरजेपैकी ७० टक्क्यांहून अधिक इंधन आयात करीत आहोत. मात्र कच्च्या तेलाचे दर ७० डॉलरपेक्षा खाली येणे हेदेखील चिंताजनक आहे. यातून तेल उत्पादक देशांमध्ये भू-राजकीय अस्थिरता वाढेल, जे भारतासारख्या देशाला ते परवडण्यासारखे नाहीच.
उदय कोटक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्र बँक