रुपयाही डॉलरपुढे सत्तरीपार नतमस्तक!

मुंबई : देशातील इंधनाच्या पूर्ततेसाठी आयात केल्या जाणाऱ्या ‘ब्रेन्ट क्रूड’च्या आंतरराष्ट्रीय किमती गुरुवारी प्रति पिंप ७५ डॉलरच्या पुढे गेल्या. विद्यमान २०१९ सालात खनिज तेलाच्या किमतीने गाठलेला हा सर्वोच्च स्तर असून, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा गाठलेल्या ७० च्या नीचांकाने ही चिंता आणखीच गहरी बनली आहे. गुरुवारी ३९ पैशांनी गडगडून रुपयाने प्रति डॉलर ७०.२५ पातळीवर लोळण घेतली.

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इराणवरील आर्थिक निर्बंध कठोर करताना, इराणकडून तेल आयातीसाठी काही देशांनी दिलेली तात्पुरती सवलतही संपुष्टात आणण्याचा चार दिवसांपूर्वी इशारा दिला आहे. इराणवरील ही तेल आयातबंदी २ मेपासून लागू होणार आहे. त्यामुळे प्रति पिंप ५० ते ६० डॉलरदरम्यान असलेल्या ब्रेन्ट क्रूडच्या किमतींनी अकस्मात उसळी घेतली असून, विश्लेषकांच्या मते त्या वेगाने प्रति पिंप ८० डॉलरचा स्तरही गाठताना दिसतील.

खनिज तेलाच्या आयात किमतीची मुसंडी आणि त्या धास्तीने स्थानिक भांडवली बाजारातील विक्रीपोटी मोठी घसरण या दोन्ही घटकांचा रुपयाच्या मूल्यावर गुरुवारी मोठा ताण दिसून आला. प्रति डॉलर ७०.२५ हे रुपयाचे विनिमय मूल्य दीड महिन्यांच्या काळातील म्हणजे ६ मार्च २०१९ नंतरचे सर्वात निम्नस्तर आहे.

खनिज तेलाच्या किमती आणि अमेरिकी डॉलर यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. सध्याच्या घडीला तेलाच्या किमती उसळत आहेतच, तर जगातील प्रमुख सहा चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरही मजबूत बनत चालले आहे. रुपयाच्या मूल्यातील ताज्या घसरगुंडीला हा दुहेरी आघात कारणीभूत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्ही. के. शर्मा यांनी स्पष्ट केले.

तुटीला खिंडार, महागाईला खतपाणी

खनिज तेलाच्या आयात किमती १० टक्के वाढल्या तर देशाच्या चालू खात्यावरील तूट (कॅड) ०.४० टक्के इतकी विस्तारते, असे चित्र आहे. रुपयाच्या मूल्यातही यातून ३ ते ४ टक्के इतकी घसरण संभवते. तर देशांतर्गत चलनवाढ (महागाई) यातून ०.२४ टक्क्यांनी वाढेल, असे या घडामोडींचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्ही. के. शर्मा यांनी अर्थव्यवस्थेसाठी घातक विश्लेषण मांडले आहे. याच सावटाच्या धास्तीने शेअर निर्देशांकही तीव्रतेने गडगडले.