सरलेल्या एप्रिलपासून आंतराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत मागणीअभावी निरंतर सुरू राहिलेली घसरण थांबली असून, अमेरिकी बाजारातील डब्ल्यूटीआय खनिज तेलाचे वायदे व्यवहार प्रथमच प्रति पिंप ५० डॉलरचा उच्चांक गाठताना दिसून आले. सौदी अरेबियाने फेब्रुवारीच्या प्रारंभापासून प्रति दिन उत्पादनात १० लाख पिंपाची कपात करीत असल्याची मंगळवारी केलेल्या घोषणेचे बाजारात असे विपरीत पडसाद उमटले.
करोनाच्या वैश्विक साथीमुळे थंडावलेल्या अर्थचक्राच्या परिणामी खनिज तेलाच्या मागणीही लक्षणीय रूपात प्रभावित झाली होती. त्यामुळे एप्रिल २०२० पासून किमतीही गडगडून नकारात्मक स्तरावर होत्या.
मंगळवारच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे) व्यवहारात डब्लूटीआयच्या वायद्यांनी अकस्मात पाच टक्क्य़ांनी उसळी घेत, प्रति पिंप ५०.२० डॉलरचा स्तर दाखविला. प्रति पिंप अडीच डॉलरपेक्षा जास्त किमतीत झालेली ही वाढ आहे. भारताकडून आयात होणाऱ्या तेलाच्या किमती या प्रामुख्याने ब्रेंट क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर आधारलेल्या असतात. त्याच्याही वायदा किमती प्रति पिंप ५३.६० डॉलपर्यंत भडकलेल्या दिसून आल्या. ‘एमसीएक्स’वर खनिज तेलाच्या जानेवारीच्या वायद्याच्या व्यवहार प्रति पिंप ३,६६९ रुपयांवर बुधवारी सुरू होते.
तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना ‘ओपेक’ आणि तिच्या सहयोगी ज्यांना ‘ओपेक प्लस’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी फेब्रुवारीमध्ये उत्पादन स्थिर ठेवण्यास सहमती दर्शविली. मात्र सौदी अरेबियाने आश्चर्यकारकरीत्या फारकत घेत, या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दैनंदिन १० लाख पिंपाची उत्पादन कपातीचा निर्णय एकतर्फी जाहीर केला. रशिया आणि कझाकस्तानकडून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संयुक्तपणे पडणारी प्रति दिन ७५,००० पिंपाच्या भर पडण्याच्या सकारात्मक बातमीपेक्षा, सौदीच्या उत्पादन कपातीच्या बातमीवर नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या.
वर्ष २०२०च्या सुरुवातीला डब्लूटीआय खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ६३ डॉलरच्या आसपास होत्या, मात्र वर्षांची सांगता २०.५४ टक्क्य़ांच्या नुकसानीसह प्रति पिंप ४८.५० डॉलर या किमतीवर त्यांनी केली. नववर्षांच्या प्रारंभापासून पुन्हा तेलाच्या किमतीचा वरच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचे दिसते.
निर्देशांकांचे विक्रमी शिखर मागे
गुंतवणूकदारांच्या समभागविक्री दबावरूपी नफेखोरी धोरणामुळे भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी टप्प्यापासून अखेर बुधवारी माघारी फिरले. परिणामी सेन्सेक्समध्ये १० सत्रानंतर प्रथमच सत्रघसरण नोंदली गेली. सेन्सेक्स आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात २६३.७२ अंश घसरणीने ४८,१७४.०६ पर्यंत खाली आला, तर निफ्टी ५३.२५ अंश घसरणीमुळे १४,१४६.२५ वर येऊन थांबला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 1:17 am