निफ्टी विक्रमापासून माघारी; मुंबई निर्देशांक ४१,५०० च्या आत

मुंबई : वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजारात नफेखोरी साधताना गुंतवणूकदारांनी दोन्ही प्रमुख निर्देशांकांना सप्ताहअखेरीस घसरण नोंदविण्यास भाग पाडले. यामुळे गुरुवारी विक्रमी स्तर गाठणारा निफ्टी निर्देशांक आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात माघारी फिरला. अमेरिका-इराण संघर्षांने शुक्रवारी जागतिक बाजारात चिंता उमटतानाच कच्चे तेल तसेच रुपयासारख्या चलनावरही विपरीत परिणाम नोंदला गेला.

भांडवली बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक गुरुवारी वरच्या टप्प्यावर होते. सेन्सेक्सने ३०० अंशांची झेप नोंदविली होती. तर निफ्टी १२,३०० पर्यंत प्रथमच पोहोचला होता. शुक्रवारी निफ्टीत ५५.५५ अंश घसरण होऊन निर्देशांक १२,२२६.६५ वर स्थिरावला. तर १६२.०३ अंश घसरणीसह सेन्सेक्स ४१,४६४.६१ पर्यंत येऊन थांबला.

अमेरिकेने इराणवर केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकही घसरले. तर युरोपीय भांडवली बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीसह झाली.

माहिती तंत्रज्ञान समभागांना मागणी

भक्कम डॉलरमुळे भांडवली बाजारात सूचिबद्ध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले. प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहअखेरच्या व्यवहारात घसरण होऊनही अमेरिकी डॉलरच्या रूपात मोठा महसूल मिळविणाऱ्या येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग जवळपास २ टक्क्यांपर्यंत वाढले. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्र यांचा समावेश राहिला. तर मुंबई शेअर बाजारातील याबाबतचा क्षेत्रीय निर्देशांक गुरुवारच्या तुलनेत १.५२ टक्क्यांनी वाढला.

मौल्यवान धातूदरात चकाकी

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती वाढत असतानाच तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण नोंदली जात असतानाच मौल्यवान धातूच्या दरात शुक्रवारी मोठी उसळी नोंदली गेली. मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोन्याचे दर तोळ्यामागे एकाच व्यवहारात थेट ८७० रुपयांनी वाढून जवळपास ४० हजाराच्या उंबरठय़ावर पोहोचले. तर चांदीच्या किलोच्या किंमतीत जवळपास १,००० रुपयांची भर पडून पांढरा धातू ४७,३०० पुढे पोहोचला. राजधानीतही सोने आता १० ग्रॅमसाठी ३९,९०० पर्यंत पोहोचले आहेत.

अमेरिकी बाजाराची घसरणीने सुरुवात

वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचे अपेक्षित पडसाद जागतिक महासत्तेच्या प्रमुख निर्देशांकांवर उमटले. भारतीय प्रमाणवेळेनुसार, शुक्रवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेले तेथील डाऊ जोन्स इंडस्ट्रिअल अ‍ॅव्हरेज, एस अँड पी५००, नॅसडॅक कंपोझिट इन्डेक्स एक टक्केपर्यंतच्या घसरणीत होते. डाऊ जोन्स व एस अँड पी५०० निर्देशांकांमध्ये प्रत्येकी ०.९ टक्के घसरण होऊन हे निर्देशांक रात्री ८.३० वाजता अनुक्रमे २८,६१६.२७ व ३,२२९.२२ वर नॅसडॅक १ टक्के वाढीसह ८,९९९.८४ पर्यंत प्रवास करत होता.

युद्ध-संघर्षांमुळे इंधन दराचा भडका

अमेरिका-इराणमधील नव्या संघर्षांमुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती जवळपास तीन टक्क्यांपर्यंत वाढल्या. परिणामी काळ्या सोन्याने पुन्हा एकदा प्रति पिंप ६८चा टप्पा पार केला आहे. लंडनबरोबरच अमेरिकेच्या बाजारातील खनिज तेलाच्या किमतीही वाढू लागल्या आहेत.

भक्कम डॉलरमुळे रुपयात घसरण

अमेरिका-इराण युद्धाचे सावट सप्ताहअखेरीस भांडवली बाजाराप्रमाणेच परकी चलन विनिमय मंचावरही उमटले. शुक्रवारच्या एकाच व्यवहारात तब्बल ४२ पैशांची आपटी अनुभवल्यानंतर स्थानिक चलन ७१.८० पर्यंत स्थिरावले. परिणामी रुपयाने गेल्या दीड महिन्यातील किमान स्तर आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात गाठला.