गेल्या अनेक सत्रांपासून प्रतिपिंप ६० डॉलरखाली प्रवास करणाऱ्या खनिज तेलाचे दर बुधवारी थेट ५२ डॉलर प्रतिपिंपपर्यंत येऊन धडकले. तेलाचे हे दर आता गेल्या सहा महिन्यांच्या तळात विसावले आहेत.
खनिज तेल उत्पादनात आघाडी घेणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत व्याजदराबाबतच्या निर्णयाची प्रतीक्षा असतानाच तेल दरात बुधवारी एकदम उतार आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर काही व्यवहारांपासून ५७ ते ५९ डॉलर
प्रतिपिंपदरम्यान फिरत आहेत. बुधवारी मात्र त्यात पिंपामागे थेट ५ ते ७ डॉलर घसरण नोंदली गेली. ५३ डॉलरनजीकचा तेलाचा हा सहामाही किमान स्तर आहे.
गुरुवार उशिरानंतर संपणाऱ्या फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत व्याजदर वाढीबाबत निर्णय झाल्यास तेलाच्या दरांमध्ये पुन्हा तेजी दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुधवारच्या एकाच व्यवहारात तब्बल १० टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविणारे खनिज तेल आता जानेवारी २०१५ नंतरच्या किमान स्तरावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर यापूर्वी १४७ डॉलर प्रतिपिंप अशा सर्वोच्च स्थानावर पोहोचलेले आहेत.
कमालीच्या घसरत्या कच्च्या तेलाच्या दरांनी बुधवारी भारताच्या भांडवली बाजारात विशेषत: हवाई प्रवासी कंपन्यांच्या समभागांना वरचा भाव मिळवून दिला. विमान कंपन्यांना येणाऱ्या एकूण खर्चापैकी एक तृतीयांश हिस्सा हा इंधनावर खर्च करावा लागतो. परिणामी, स्वस्त इंधन दरांमुळे मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध जेट एअरवेजचा समभाग तर सत्रात १९ टक्क्यांपर्यंत वाढला.