आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर पुन्हा तेजीकडे वाटचाल करू लागले आहे. लंडनच्या बाजारात खनिज तेलाच्या किमतीने गुरुवारी ४० डॉलर प्रति पिंपचा पल्ला पार केला.

प्रमुख तेल उत्पादक देशांनी (ओपेक) आणि रशियाने कच्च्या तेलातील भरीव उत्पादन कपात पुढील काही महिने कायम ठेवण्याचे संकेत दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाल्याचे मानले जाते. अनेक देशांमध्ये टाळेबंदी शिथील होऊन रस्ते आणि हवाई वाहतूक सुरू झाली असून अनेक शहरांमध्ये कारखाने आणि उत्पादन सुरू झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जगातील दोन मोठय़ा अर्थव्यवस्थांमधील काही महत्त्वाचे व्यापारी करार रद्द करण्यावरून तणाव वाढत आहे. हा करार रद्द झाल्यास कच्च्या तेलाची मागणीही कमी होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक व्यवसायांमध्ये जोखमेच्या मालमत्तेची मागणी वाढल्याने सोन्याच्या किमती मात्र कमी होत असून अनेक देशांनी टाळेबंदी संदर्भातील निर्बंध शिथिल केल्याने तसेच वेगाने आर्थिक सुधारणेसाठी योजना आखल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये घसरण दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.