19 February 2020

News Flash

उद्यमशील, उद्य‘मी’ : कंपनी सामाजिक बांधिलकी अर्थात ‘सीएसआर’ : कठोर अंमलबजावणी!

कंपन्यांना २०१४ सालापासून त्यांच्या नफ्यातील २% रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

मकरंद जोशी – makarandjoshi@mmjc.in

काही कंपन्यांना २०१४ सालापासून त्यांच्या नफ्यातील २% रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे. परंतु ज्या कंपन्या असा खर्च करत नव्हत्या त्यांच्यावर कारवाई करण्याबद्दल पुरेशी तरतूद कंपनी कायद्यात नव्हती. नवीन नियमाप्रमाणे ज्या कंपन्या सामाजिक बांधिलकीपोटी खर्च करणार नाहीत त्या कंपन्यांना रु. ५,००,००० ते रु. २५,००,००० पर्यंत दंड होऊ  शकतो. तसेच अशा कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना रु. ५०,००० ते रु. ५,००,००० पर्यंत दंड होऊ  शकतो! बदललेल्या नियमाप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता होती; परंतु तो नियम शिथिल होणार आहे.

हा नियम कोणाला लागू आहे?

ज्या कंपन्यांचा नफा रु. ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा ज्यांची उलाढाल रु. १,००० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा ज्यांची निव्वळ मालमत्ता रु. ५०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा कंपन्यांना हा नियम लागू आहे. हा नियम छोटय़ा कंपन्यांना लागू नाही. हा नियम भागीदारीतील आस्थापनांना लागू नाही.

पुरे ५०,००० कोटी!!!

२०१८-१९ या वर्षांत रु. ५०,००० कोटी एवढी रक्कम कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकीवर खर्च होणे अपेक्षित होते. ही रक्कम केवळ सामाजिक संस्थांना देणगी स्वरूपात देऊ न कंपन्यांची जबाबदारी संपत नाही. समाजशास्त्र किंवा अशा स्वरूपाचे शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही खूप चांगली संधी आहे. ही रक्कम दरवर्षी खर्च करायची असल्यामुळे त्याचे स्वरूप मोठे होऊ  शकते.

कंपन्यांचा दृष्टिकोन

अनेक कंपन्या सामाजिक बांधिलकीचा उपयोग जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी करतात. तर काही कंपन्या परिसरात सुधारणा क रून नागरिकांमध्ये सौदार्हाचे वातावरण निर्माण करतात. परंतु काही कंपन्या सामाजिक बांधिलकीचा गैरफायदा घेताना दिसतात. लवकरच कंपनी सामाजिक बांधिलकी परीक्षणाची घोषणा झाल्यास नवल नको.

सरकारच्या म्हणण्याप्रमाणे कंपन्यांनी अधिक परिणामकारक कामगिरी करणे अपेक्षित आहे. तसेच कंपनी सामाजिक बांधिलकीमध्ये केलेल्या खर्चाच्या परिणामांची मोजदाद करणे अपेक्षित आहे.

सामाजिक संस्थांचा दृष्टिकोन

कित्येक चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्था आपले हिशेब व परीक्षण वेळच्या वेळी करून घेत नाहीत व त्यामुळे सामाजिक बांधिलकी मिळण्याच्या संधीला मुकतात. तर काही संस्था आपले काम चांगल्या पद्धतीने कंपन्यांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. कंपनी आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये दुवा बनण्याचे कामही खूप महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात पुरामुळे खूप नुकसान झाले आहे. ही परिस्थिती पाहता सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या सहकार्यातून परिस्थिती पूर्ववत करण्यास कंपनी सामाजिक बांधिलकीमार्फत भरीव मदत व्हावी, अशी आशा आहे!

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

First Published on September 10, 2019 2:53 am

Web Title: csr rules indian companies must to give 2 percent of profits to charity zws 70
Next Stories
1 दोन दशकांतील सुमार वाहन विक्री
2 ‘एसआयपी’ : पोर्टफोलियोतील गुंतवणूक संधी..
3 ‘एसबीआय’ची व्याजदर कपात
Just Now!
X