पासपोर्ट व व्हिसा अशा घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी विनिमय दर, चलन विनिमय व क्रेडिट कार्डाचा वापर याविषयी सखोल माहिती करून घेणे आवश्यक आहे. नजीकच्या कालावधीत परदेशी प्रवास करण्याचे नियोजन असेल तर संबंधित ठिकाणाचे चलन विचारात घ्यावे, थोडी पूर्वतयारी करावी आणि उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांची माहिती घेणे आवश्यक ठरते.
चलन विनिमय दर माहित करून घ्यावा :
चलन विकत घेताना पासपोर्टसोबत असणे बंधनकारक आहे. चलन विनिमयासाठी चालून विनिमय दर माहित असणे गरजेचे आहे. हा दर वृत्तपत्रात वा ऑनलाइन वा मनी चेंजरकडे उपलब्ध असतो. साधारणत: दोन प्रकारचे दर दर्शवले जातात. खरेदीचा दर व विक्रीचा दर. परकीय चलनाचे रूपांतर स्थानिक चलनामध्ये करताना खरेदीचा दर लागू होतो आणि तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या (इंटरबँक रेट – चलन दर या आयबीआरनुसार ठरवला जातो) दरापेक्षा अनेकदा कमी असतो आणि स्थानिक चलनाचे रूपांतर परकीय चलनात करताना विक्रीचा दर लागू होतो आणि तो आयबीआरच्या दरापेक्षा अधिक असतो.
परकीय चलन किती घेता येऊ शकते याची मर्यादा :
रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक प्रवासासाठी अधिकृत विक्रेत्याकडून १० हजार डॉलपर्यंत, शिक्षणासाठी १० हजार डॉलपर्यंत, व्यवसाय फेरीसाठी २५ हजार डॉलपर्यंत आणि वैद्यकीय फेरीसाठी १० हजार डॉलपर्यंत परकीय चलन खरेदी करता येते.
केवायसी तपशिलासह अधिकृत एक्स्चेंज हाऊस वा बँकेकडे जावे :
काही सेवा शुल्क वा व्यवहारा शुल्क वा केवायसी तपशील द्यावा लागला तर स्थानिक चलनाचे परकीय चलनात वा परकीय चलनाचे स्थानिक चलनात रूपांतर करण्यासाठी एक्स्चेंज हाऊस वा बँकेत व्यवहार करणे नेहमी सुरक्षित ठरते. त्यासाठी योग्य पावती वा पुरावाही मिळतो.
परकीय व्यवहारासाठी सेवाशुल्क व निर्धारित मर्यादा जाणून घ्यावी :
एक्स्चेंज हाऊस व बँका शुल्क आकारतात. त्यामुळे बँक वा एक्स्चेंज हाऊसकडे या शुल्कांविषयी चौकशी करावी.
विदेशी कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा :
परदेशी प्रवास करताना विदेशी कार्ड हे उत्तम साधन आहे. विविध प्रकारची कार्डे उपलब्ध असून ती आपल्या गरजेनुसार व नियमांनुसार रिलोड करता येऊ शकतात. ट्रॅव्हल कार्डाची वैशिष्ट्ये, त्यांच्या वापरासाठी शुल्क माहित करून घ्यावी आणि प्रवासात त्यांचा पिन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित ठेवावा. एटीएममध्ये ट्रॅव्हल कार्डचा वापर करणे टाळावे. कारण यामुळे काही शुल्क भरावे लागू शकते. कार्ड त्या देशाच्या चलनामध्ये असेल तर सर्व खरेदीच्या वेळी त्याचा वापर करावा.
(लेखक यूएई एक्सचेंज अ‍ॅण्ड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)