चिंतेची बाब नसल्याचा सरकारचा दावा

नवी दिल्ली : इंधनाचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय यामुळे यंदा चालू खात्यावरील तूट वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तरी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात २.५ टक्के तूट चिंतेची बाब नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

विदेशी चलनाचा देशातील ओघ तसेच निर्गमन यातील तफावत असलेली चालू खात्यातील तूट २०१७-१८ या गेल्या वित्त वर्षांत ४८.७ अब्ज डॉलपर्यंत वाढली होती. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण १.९ टक्के होते. आधीच्या वर्षांतील १४.४ अब्ज डॉलर म्हणजेच ०.६ टक्क्याच्या तुलनेत ते अधिक होते. यंदाही ती वाढण्याचा अंदाज आहे.

याबाबत भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले की, इंधन दराचे वाढते दर, रुपयातील सातत्याची घसरण आणि विदेशी गुंतवणूकदारांची पाठ यामुळे २०१८-१९ वर्षांतही चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता असून ती यंदा सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात २.५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. ही तूट २ टक्क्यांपुढे राहिली तरी चिंतेची बाब नाही. देशात विदेशी निधीचा ओघ उत्तम सुरू असताना काळजीचे काहीच कारण नाही, असे गर्ग म्हणाले.

गेल्या वर्षांतील १६० अब्ज डॉलरच्या व्यापार तुटीबाबतही यंदा स्थिती सुधारली असून ती ८२ अब्ज डॉलरवर घसरली आहे, असेही गर्ग यांनी सांगितले. इंधनाच्या किमती वाढत्या राहिल्या तर मात्र व्यापार तुटीबाबत चिंता निर्माण होण्यासारखी परिस्थिती होऊ शकते. एप्रिलमधील ६६ डॉलर प्रति िपप खनिज तेलाचे दर सध्या ७४ डॉलर प्रति पिंप पातळीपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये खनिज तेलदराचा वरचा टप्पा होता.