सायबर हल्ला धास्ती व्यर्थ; निर्देशांकांत अधिक भर

जगभरात पसरलेल्या सायबर हल्ल्याची भिती दूर सारत भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सोमवारी पुन्हा एकदा नव्या शिखरावर विराजमान झाले. शतकी निर्देशांक वाढीसह सेन्सेक्स ३०,३२० पुढे गेला. तर जवळपास अर्धशतकी निर्देशांक वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ९,५०० नजीकचा प्रवास नोंदविता आला.

ब्रिटन, रशियासह १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेली सायबर हल्ल्याची भिती सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांकडून नाहीशी झाली. उलट गेल्या महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमी झाल्याचे स्वागत बाजारात झाले. तसेच डॉलरच्या तुलनेत भक्कम बनलेल्या रुपयाचीही दखल घेतली गेली. स्थानिक चलन आता २१ महिन्यांच्या वर आहे.

एकाच व्यवहारात १३३.९७ अंश वाढ नोंदवित मुंबई निर्देशांक ३०,३२२.१२ या नव्या टप्प्याला पोहोचला. तर ४४.५० अंश वाढीसह निफ्टीनेही ९,४४५.४० हा विक्रमी स्तर गाठला. यामुळे दोन्ही निर्देशांकांचे गेल्या आठवडय़ातील सर्वोच्च टप्पेही मागे टाकले गेले.

मार्च २०१७ अखेरच्या तिमाहीतील सुमार कामगिरीने आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर तसेच आयनॉक्स विंड भांडवली बाजार दफ्तरी सपाटून आपटला. दोन्ही समभागांचे मूल्य दुहेरी अंक टक्केवारीत सोमवारी खाली आले.

भारतीय वेधशाळेच्या यंदाच्या चांगल्या मान्सूनच्या आशेवर सोमवारी ग्राहकोपयोगी वस्तू तसेच रसायन व खते निर्मिती क्षेत्र तेजाळले. तर सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक, ४.३५ टक्क्य़ांसह वाढला.

डॉ. रेड्डीज्, ल्युपिन, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, ओएनजीसी आदी २.४० टक्क्य़ांपर्यंत वाढले. पोलाद, आरोग्यनिगा, स्थावर मालमत्ता क्षेत्रीय निर्देशांकही तेजीच्या यादीत राहिले.

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.२५ व ०.७८ टक्के वाढ झाली.