सायरस मिस्त्री यांना दिलासा देणाऱ्या अपील लवादाचा आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा समूहातील हिस्सा विक्रीकरिता सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणू नये, असे राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाने टाटा सन्सला बजावले आहे. अपिलाच्या पुढील निर्णयापर्यंत हिस्सा विक्रीची प्रक्रिया राबवू नये, असाही आदेश देण्यात आला आहे.

टाटा सन्सचे ‘खासगी कंपनी’ म्हणून रुपांतरणाला मिस्त्री यांनी घेतलेला आक्षेप अपील लवादाने यापूर्वी फेटाळला आहे. खासगी कंपनी म्हणून परिवर्तनाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मिस्त्री यांची मागणीही धुडकावून लावण्यात आली आहे. तरी ताजा आदेश त्यांच्यासाठी दिलासादायी ठरू शकेल.

टाटा सन्सचे खासगी कंपनीत परिवर्तन झाल्यानंतर समूहातील हिस्सा मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना समूहाबाहेर विकण्यावर प्रतिबंध आले होते. याकरिता या परिवर्तनालाच मिस्त्री यांनी अपील लवादाकडे धाव घेत विरोध दर्शविला होता. मात्र अपील लवादाने गेल्या याचिकेदरम्यान हा विरोध फेटाळून लावला. अपील लवादाच्या शुक्रवारच्या निर्णयाने मात्र मिस्त्री यांना हिस्सा विक्रीकरिता टाटा समूहाने दबाव आणू नये, असे सांगितले आहे.

अपील लवादाने या प्रकरणातील अंतिम सुनावणी मात्र तूर्त स्थगित ठेवली आहे. तेव्हा ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत हिस्सा विक्रीची प्रक्रियाही न राबविण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी आता २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

ऑक्टोबर २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर टाटा सन्सने बोलाविलेल्या भागधारकांच्या सभेत खासगी कंपनी परिवर्तनाला मंजुरी दिली होती. त्याला मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाच्या मुंबई खंडपीठात आव्हान दिले होते. लवादाच्या या निर्णयाला अपील लवादाने शिक्कामोर्तब केले व खासगीकरणाचा निर्णयही कायम ठेवला.

टाटा सन्समध्ये टाटा विश्वस्तानंतर सायरस मिस्त्री व कुटुंबीय यांचा १८.४ टक्क्यांच्या रूपात दुसरा मोठा हिस्सा आहे. रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर मिस्त्री २०१२ मध्ये समूहाचे अध्यक्ष बनले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyrus mistry
First published on: 25-08-2018 at 01:33 IST