मिस्त्री कुटुंबियांना टाटा समूहाच्या संचालक मंडळावर संचालक नेमण्याचा कोणताही अधिकार नाही, असे टाटा सन्सने सोमवारी स्पष्ट केले.

मिस्त्री यांच्या गुंतवणूक कंपनीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या उत्तरात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’नुसार असा कोणताही अधिकार मिस्त्री कुटुंबियांना दिला जाऊ शकत नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

टाटा सन्सच्या संचालकपदावरून मिस्त्री यांना काढण्यासाठी समूहाची विशेष सर्वसाधारण सभा ६ फेब्रुवारी रोजी बोलाविण्यात आली आहे.

टाटा सन्समध्ये शापूरजी पालनजी समूहाचा १९६५ पासून १८.४ टक्के हिस्सा असताना १९८० मध्ये प्रथम कंपनीच्या संचालक मंडळावर पालनजी शापूरजी मिस्त्री यांना नेमण्यात आले होते, असे टाटा सन्सने म्हटले आहे. पालनजी शापूरजी मिस्त्री हे २००४ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र सायरस मिस्त्री हे कंपनीच्या संचालक मंडळात दोन वर्षांनी आले. त्यांची नियुक्ती ही मिस्त्री कुटुंबिय अथवा त्यांच्या उद्योग समूहातून झाली नव्हती, असेही नमूद करण्यात आले आहे.

मिस्त्रींना राजीनामा देण्यास सांगितले होते

मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढण्यापूर्वी स्वत: रतन टाटा यांनी मिस्त्री यांना बाजूला होण्याची विनंती केली होती; मात्र त्यानंतरही याबाबत न एकल्यानंतर मिस्त्री यांना हटविण्यात आले, असे स्पष्टीकरण टाटा सन्सने सोमवारी दिले. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादापुढे मिस्त्री यांच्या गुंतवणूक कंपनीने केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून टाटा समूहाने ही बाब स्पष्ट केली आहे. मिस्त्री यांच्यावरील विश्वास संपुष्टात आल्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय टाटा सन्सच्या संचालक मंडळाने बहुमताने घेतला, असेही टाटा सन्सने म्हटले आहे.