टाटा समूहातील कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून सायरस मिस्त्री यांचे आवाहन

टाटा समूहाच्या एकूण महसुलात विदेशातील व्यवसायांचा ७० टक्क्य़ांपर्यंत वाटा पोहोचला असतानाही देश-विदेशातील कंपन्यांच्या संपादनांबाबत आशावादासह, नैसर्गिकरीत्या वाढीलाही गती देण्यासाठी सध्याच्या ‘खडतर काळा’त चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे आवाहनवजा आग्रही प्रतिपादन टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी मंगळवारी केले.

शाश्वत आणि नफाक्षम वाढीच्या दिशेने समूहातील प्रत्येक कंपनीने स्वतंत्र रणनीती आणि यशकथेद्वारे वाटचाल सुरू ठेवायलाच हवी, असे मिस्त्री यांनी टाटा डॉट कॉम या समूहाच्या अधिकृत वेबस्थळावर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. रतन टाटा यांचे वारसदार म्हणून टाटा समूहाची धुरा हाती घेतलेल्या तीन वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून घेतल्या गेलेल्या या मुलाखतीत मिस्त्री यांनी साध्य केलेल्या प्रगतीचीही मांडणी केली आहे. या तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३० टक्के वृद्धिदराने प्रगती साधली गेली. टाटा समूहाने गत दशकभरात ४,१५,००० कोटी रुपये (७९ अब्ज अमेरिकी डॉलर) इतकी देशा-विदेशात भांडवली गुंतवणूक केली, त्यापैकी १,७०,००० कोटी रुपये (२८ अब्ज डॉलर) हे गेल्या तीन वर्षांत गुंतविले गेले आहेत.

आपण व्यवसायातून किती रोकड प्रवाह निर्माण केला हे विकासाचे मुख्य परिमाण आपण मानतो. समूहाच्या स्तरावर गत तीन वर्षांत आपण ३० टक्के वार्षिक वृद्धिदराने रोकड प्रवाह निर्माण केला. परंतु हे परिमाण पुरते खरे नाही, प्रत्येक व्यक्तिगत कंपनीने ‘वाढीचा अधिकार’ हा स्व-हिमतीवर कमावण्याइतके सक्षम बनले पाहिजे, असे मिस्त्री म्हणाले.

आपण टाटा समूहाची निर्मिती पुढल्या १५० वर्षांसाठी करीत आहोत, असे नमूद करीत त्यांनी नव्याने खुल्या झालेल्या इराण आणि म्यानमारच्या बाजारपेठांतील संधी खुणावत असून, अनेक टाटांच्या कंपन्या तेथे शक्ती पणाला लावत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

जोखीम घेण्याच्या पातळीवर आपण जर चपळता दाखविला नाही, तर आपण मागे पडणे क्रमप्राप्त आहे, असे नमूद करीत त्यांनी संरचनात्मक तत्परता, चपळाई आणि नव्या बदलांचा खुलेपणाने स्वीकाराची हाक दिली. आजच्या आव्हानात्मक व खडतर अशा कालखंडात ही काळाचीच गरज असल्याचे मिस्त्री म्हणाले.

नुसता नेतृत्वबदल नव्हे, तर  पिढीमधील बदल !

टाटा सन्सच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती येणे हा नित्यनैमित्तिक नेतृत्वबदल केवळ नसून तो एका ‘पिढीगणिक झालेला बदल’ सिद्ध होईल, असे मिस्त्री यांनी जोर देऊन सांगितले. नवनावीन्यता आणि तंत्रज्ञानाची कास ही आगामी काळातील विकासाची चालकशक्ती बनेल आणि बदलत असलेल्या काळपटात आपले आगळे स्थान यातूनच निर्माण होऊ शकेल, असे ते म्हणाले. यासाठी संशोधन आणि विकासावर सुयोग्य प्रमाणात गुंतवणुकीची गरजही त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या डिजिटल प्रवाहाला साजेशा टाटा क्लिक, टाटा आयक्यू आणि टाटा डिजिटल हेल्थ या तीन नव्या कंपन्यांच्या सुरू झालेल्या वहिवाटीचा मिस्त्री यांनी कौतुकाने उल्लेख केला.