नवी दिल्ली : टाटा समूहातून करण्यात आलेल्या हकालपट्टीबरोबरच टाटा सन्सच्या कंपनी रचनेतील परिवर्तनालाही सायरस मिस्त्री यांनी आव्हान दिले आहे. मिस्त्री यांच्या या आव्हानाबाबत येत्या शुक्रवापर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदे अपील लवादाने बुधवारी दिले.

राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाच्या निलंबन कायम ठेवण्याच्या निर्णयाला मिस्त्री यांनी आव्हान दिले आहे. त्याचबरोबर दोन सदस्यीय अपील लवाद खंडपीठासमोर टाटा सन्सच्या परिवर्तन रचनेलाही मिस्त्री यांनी कायदे अपील लवादात आव्हान दिले आहे.

मिस्त्री यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये टाटा सन्सचे रूपांतर स्वायत्त कंपनीवरून खासगी कंपनीत करण्यात आले. या बदलालाच मिस्त्री यांनी अपील लवादातील नव्या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावर टाटा सन्सला येत्या शुक्रवापर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. तर यावरील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे.