नियमाविरुद्ध कारवाई झाल्याची

कंपनी निबंधकांची माहिती

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना बाजूला करताना केवळ कंपनी कायदा, रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांचेच उल्लंघन झाले नाही तर खुद्द टाटा सन्सच्या कलमांचाही नियमभंग झाल्याचे कंपनी निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

माहितीच्या अधिकारान्वये ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मिस्त्री यांच्याच शापूरजी पालनजी समूहाच्या गुंतवणूक कंपनीने याबाबतची माहिती मागितली होती. त्यावर दिलेल्या उत्तरात मुंबईचे कंपनी निबंधक उदय खोमणे यांनी ही माहिती दिली आहे.

कंपनी कायदा तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांविरुद्ध सायरस मिस्त्री यांना टाटा सन्स तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या प्रमुखपदावरून दूर करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच टाटा सन्सच्या स्वत:हून आखलेल्या नियमांचाही भंग झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनी कायदा २०१३ आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या गैरबँकिंग वित्त कंपन्यांबाबतच्या तसेच टाटा सन्सच्या ११८ नियमांचा (आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) भंग करून मिस्त्री यांना मुख्य पदावरून हटविले गेले, असे माहिती अधिकारांतर्गत प्रश्नाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

कंपनी रजिस्ट्रारचे हे मत राष्ट्रीय कंपनी कायदे लवादापेक्षा पूर्णत: भिन्न असल्याचे मानले जाते. लवादाच्या चालू वर्षांतील सुनावणीदरम्यान याच कारणास्तव मिस्त्री यांची निष्कासन आव्हान याचिका निकालात काढण्यात आली होती.

मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये समूहातून काढून टाकण्याचा निर्णय टाटा सन्सने घेतला होता. त्यानंतर समूहातील उपकंपन्यांचे अध्यक्षपदही त्यांच्याकडून व्यवस्थापनाने काढून घेतले. ही लढाई लवादात गेल्यानंतर मिस्त्री यांनी उर्वरित कंपन्यांच्या संचालक मंडळावरील आपल्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला.

टाटा मोटर्सला तिमाहीत मोठा तोटा

टाटा सन्स समूहातील टाटा मोटर्सला चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल १,००९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीच्या ताळेबंदावर तिची ब्रिटिश नाममुद्रा जग्वार लॅण्ड रोव्हरच्या ११ टक्के घसरत्या महसुलाचा विपरीत परिणाम नोंदला गेला आहे. कंपनीने वर्षभरापूर्वीच्या जुलै ते सप्टेंबर २०१७ तिमाहीत सुमारे २,५०१.६७ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.