तरुणांतील नवप्रतिभा व गुणवत्तेच्या धांडोळ्यासाठी व्यवस्थापन संस्था आणि बी-स्कूल्सची कॅम्पस पालथी घालणाऱ्या उद्योगक्षेत्रातून आता नव्या उत्पादनांच्या प्रस्तुतीची वाटही तेथून खुली करण्याचा नवीन प्रघात सुरू झाला आहे. ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील डाबर इंडिया लिमिटेडने अलीकडेच या धाटणीचा पहिला उपक्रम राबवताना, आपल्या जास्मिन हेअर ऑइल या नव्या उत्पादन वर्गातील प्रवेशाच्या घोषणेसाठी मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यादालनाचा वापर केला.

डाबरने विशेष विपणन व विक्री धोरणाअंतर्गत ‘कॅम्पस ड्रीम्स’ या नावाच्या या उपक्रमाची आखणी केली असून, असे प्रयोग देशाच्या अन्य भागांत यापुढेही केले जातील, असे कंपनीचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ) व्ही. कृष्णन यांनी सांगितले. वाटिका जास्मिन नॉन-स्टिकी खोबरेल केश तेलाचे या प्रसंगी अनावरण करण्यात आले.

भावी कर्मचारी आणि चाणाक्ष तरुण ग्राहक यांच्यापर्यंत एकाच वेळी पोहोचून भविष्यासाठी सुसज्जता करण्याचा फायदा अशा उपक्रमांतून कंपनीला निश्चित होईल, असे कृष्णन यांनी यामागची भूमिका विशद करताना सांगितले. शिवाय व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना एरव्ही जो विषय शिकायला सहा महिने लागतात, त्याचेच व्यावहारिक रूप या केवळ अडीच-तीन तासांच्या कार्यक्रमांतून पाहायला मिळते.
भविष्यात कॅम्पस ड्रीम्स उपक्रम केवळ नवीन उत्पादनाची प्रस्तुतीसाठीच नव्हे, तर प्रचार-प्रसार मोहीम, उत्पादनविषयक बाजार सर्वेक्षण वगैरेसाठी राबविण्याचा कंपनीचा मानस आहे.