रॅनबॅक्सी बरोबर झालेल्या एकत्रीकरणानंतर सन फार्मा या संयुक्त कंपनीतून रॅनबॅक्सीची जपानी भागीदार दाइची सान्क्यो ही कंपनी अखेर बाहेर पडली आहे. जपानी कंपनीने २०,४२० कोटी रुपयांना सन फार्मामधील आपला सर्व उर्वरित ९ टक्के हिस्सा विकल्याचा अंदाज आहे.
या परिणामी जपानी औषध निर्माण कंपनीचे भारतीय व्यवसायातील गेल्या सात वर्षांपासूनचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. मूळ रॅनबॅक्सीमध्ये हिस्सा असलेल्या कंपनीवरील अमेरिकी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सातत्याच्या औषध र्निबध कारवाईने दायइची त्रस्त होती.
९५० रुपये प्रति समभाग मूल्याने दायइची सॅन्कोने सन फार्मामधील आपले २१,४९,६९,०५८ समभाग खुल्या बाजारातून विकत २०,४२० कोटी रुपये उभारले.
गेल्याच महिन्यात सन फार्मामध्ये रॅनबॅक्सीचे विलीनीकरण होऊन भारतातील सर्वात मोठी तर जगातील पाचवी मोठी औषधनिर्माण कंपनी उदयास आली होती. सुमारे ४ अब्ज डॉलरचा हा व्यवहार होता. यात जपानमधील आघाडीच्या औषध कंपनीचा हिस्सा कायम होता. सन फार्मामध्ये विलीन झालेल्या रॅनबॅक्सीमध्ये दायइचीने २००८ मध्ये २२,००० कोटी रुपयांना ६३.४० टक्के हिस्सा घेतला होता.
आता दाइचीच्या संचालक मंडळाने हिस्सा विक्रीसाठी परवानगी मिळविल्यानंतर बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र जवळपास तेवढीच रक्कम कंपनीला अवघा ९ टक्के हिस्सा विकण्यासाठी मोजावी लागली.