17 December 2017

News Flash

महागाई दरात सुधार ; चालू वर्षांतील नीचांक स्तर; मात्र अद्यापही ७ टक्क्यांवरच!

व्याजदराबाबत निर्णय घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकरीता महत्त्वाचा ठरणारा घाऊक किंमत निर्देशांक सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ७.२४

पीटीआय , नवी दिल्ली | Updated: December 15, 2012 1:32 AM

व्याजदराबाबत निर्णय घेण्यासाठी  रिझव्‍‌र्ह बँकेकरीता महत्त्वाचा ठरणारा घाऊक किंमत निर्देशांक सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ७.२४ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. आधीच्या महिन्यातील ७.४५ टक्के तर वर्षभरापूर्वीच्या ९.४६ टक्के पातळीवरून झालेल्या या सुधारणेने महागाईदराने चालू वर्षांतील (गेल्या १० महिन्यांतील) नीचांक स्तर दाखविला आहे.
ऐन दिवाळीच्या मोसमात भाज्यांचे दर १.१९ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मात्र बटाटे, कांदे, गहू, डाळी, मसाल्याचे पदार्थ, खाद्यतेल, साखर आदी खाद्यपदार्थाच्या किंमती मात्र चढय़ा राहिल्या आहेत. कांदे, बटाटे या कालावधीत ७२ टक्क्यांनी तर गहू, डाळी २० टक्क्यांनी महागल्या आहेत.
व्याजदर कमी होण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने गृहित धरलेला महागाईदराचा सुसह्य स्तर हा ५ ते ६ टक्के असा आहे. या पातळीवर तो येण्यास आणखी दोन ते तीन महिने लागण्याचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेसह धोरणकत्यरंकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनीही, महागाईचा घसरता क्रम स्वागतार्ह असला तरी तो ५ ते ६ टक्के असणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. तर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनीही महागाई कमी होत असली तरी विकासदर कमकुवत आहे, हे लक्षात घेऊन रिझव्‍‌र्ह बँक निर्णायक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
एकूणात येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या आढाव्यातच नव्हे तर जानेवारीमधील तिसऱ्या तिमाहीच्या आढाव्यातही व्याजदर कपातीचे धोरण रिझव्‍‌र्ह बँकेकडून लांबणीवर टाकले जाण्याची शक्यता वाढली आहे.    

सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर निर्देशांक वधारला
मुंबई : सलग पाच सत्रातील घसरण रोखताना मुंबई निर्देशांकाने शुक्रवारी, कमालीच्या खाली आलेल्या नोव्हेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकांचे स्वागत ८७.९९ अंशांच्या वाढीसह केले. सेन्सेक्स यातून १९,३१७.२५ पर्यंत गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २८.१० अंश वाढीसह ५,८७९.६० वर पोहोचला.गेल्या पाच दिवसांच्या व्यवहारातील सततच्या घसरणीमुळे  ‘सेन्सेक्स’ १९,५०० च्याही खाली आला आहे. आज मात्र नोव्हेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक ७.२४ टक्क्यांवर स्थिरावलेला पाहून गुंतवणूकदारांनीही खरेदीचे सत्र आरंभले. अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी येत्या काही आठवडय़ात सरकारकडून अधिक पावले उचलली जातील या अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानानेही शेअर बाजारातील व्यवहारांना स्फुरण चढले. गुंतवणूकदारांची नजर आता मंगळवारच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यावर आहे.

First Published on December 15, 2012 1:32 am

Web Title: dearness rate down