सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर कमी होत गेल्या दोन वर्षांच्या किमान पातळीवर विसावला. प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जानेवारीतील महागाई दर ८.७९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये हा दर ११.१६ टक्के होता.  जानेवारी २०१२ मध्ये एकूण किरकोळ महागाई दर ७.६५ टक्के होता.
खाद्यान्नांसाठीचा महागाई दर डिसेंबर २०१३च्या १२.१६ टक्क्यांवरून कमी होत, २०१४ च्या सुरुवातीच्या महिन्यात दुहेरी आकडय़ापासून फारकत घेतली आहे. जानेवारीत तो ९.९ टक्क्यांवर स्थिरावला आहे.
डिसेंबरच्या तब्बल ३८.७६ टक्क्यांच्या तुलनेत जानेवारीतील भाज्यांच्या किमती कमी होत २१.९१ टक्क्यांवर आल्या आहेत. तर फळांचे दर मात्र १४.६४ टक्क्यांवरून १५.६ टक्क्यांवर गेले आहेत. जानेवारी २०१४ मध्ये डाळी २.५९, मसाले ११.४२ व दुग्ध उत्पादने ९.८२ टक्क्यांनी वधारले आहेत. अंडी, मटण, मासेही या महिन्यात ११.६९ टक्क्यांनी महाग झाली आहेत.