मुंबई : नादारी व दिवाळखोरी प्रक्रियेतील दिवाण हाऊसिंग फायनान्स (डीएचएफएल) ने तिमाहीत आश्चर्यकारक निव्वळ नफा नोंदविला आहे. असे असले तरी या गृह वित्त कंपनीचे लेखापरीक्षक मात्र सावध पवित्र्यात आहेत.

प्रवर्तकांनीच केलेल्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या डीएचएफएलने चालू आर्थिक वर्षांच्या डिसेंबर २०१९ अखेर तिसऱ्या तिमाहीत ९३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीला वर्षभरापूर्वी, याच तिमाहीत नफा झाला होता. मात्र कंपनीला करपूर्व १६८ कोटी रुपयांच्या तोटय़ाला सामोरे जावे लागल्याने कंपनीचे लेखापरीक्षक सावध आहेत.

डीएचएफएलचे संचालक मंडळ रिझव्‍‌र्ह बँकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये बरखास्त करून, प्रशासकांच्या हाती कंपनीचा कारभार सोपविला आहे.  कंपनी सध्या राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणांतर्गत नादारी व दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरी जात आहे. यासाठी सल्लागार आणि विधिज्ज्ञ म्हणून आर. सुब्रमणिकुमार सहकार्य करत आहेत.

रोकड चणचणीमुळे कंपनीने नवीन कर्ज वितरण बंद केले असून परिणामी कंपनीच्या व्याजातून होणाऱ्या उत्पन्नात डिसेंबर २०१९ अखेर घसरण झाली आहे. वार्षिक तुलनेत ते थेट २८ टक्क्य़ांनी कमी होऊन २,३८४ कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे. कंपनीच्या एकूण महसुलात २७ टक्के घसरण झाली आहे. गेल्या तिमाहीअखेर ते २,४३२ कोटी रुपये झाले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यात डीएचएफएलने ५,९७७ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत कंपनीला १,१८७ कोटी रुपयांचा नफा झाला होता.