२०१४ च्या अखेरच्या महिन्यात वाहन कंपन्यांनी विक्रीतील वाढ राखली आहे. मारुती, ह्य़ुंदाई या कंपन्यांनी तब्बल २० टक्के अधिक वाहने डिसेंबरमध्ये विकली आहेत, तर दुचाकी वाहन क्षेत्रातही वाहनांच्या विक्रीत वाढ नोंदली गेली आहे. नव्या वर्षांपासून कंपन्यांनी त्यांच्या विविध उत्पादनांवरील वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत.
वाहन कंपन्यांना गेल्या जवळपास वर्षभरापासून असलेली उत्पादन शुल्कातील सवलतीला आता मुकावे लागणार आहे. वर्षभरात दोनवेळा विस्तारित करण्यात आलेली ८ टक्क्य़ांपर्यंतची सवलत वर्ष संपताच माघारी घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती नव्या वर्षांपासूनच महाग होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशातील सर्वात मोठय़ा मारुती कंपनीने गेल्या महिन्यात २०.८ टक्के अधिक एकूण वाहन विक्री नोंदविली आहे. डिसेंबरमध्ये कंपनीच्या १,०९,७९१ वाहनांची देशांतर्गत विक्री झाली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ९०,९२४ होती. तर देशांतर्गत विक्रीही डिसेंबर २०१३ मधील ८६,६१३ वरून यंदा १३.३ टक्के अधिक, ९८,१०९ झाली आहे. कंपनीची गेल्या महिन्यातील निर्यात तिप्पट वाढली असून यंदा ती ४,३११ वरून ११,६८२ झाली आहे.
निर्यातीत आघाडीवर असलेल्या  ह्य़ुंदाईच्या एकूण वाहन विक्रीत गेल्या महिन्यात २१ टक्के वाढ झाली. कंपनीने आधीच्या वर्षांतील डिसेंबरमधील ४९,०७८ वाहनांच्या तुलनेत यंदा ५९,३६५ वाहने विकली, तर स्थानिक बाजारातील वाहन विक्रीदेखील २८,३४५ वरून यंदा ३२,५०४ झाली आहे. कंपनीच्या निर्यातीत यंदा २९.६ टक्के भर पडली असून ह्य़ुंदाई मोटर इंडियाने डिसेंबर २०१४ मध्ये २६,८६१ वाहनांची निर्यात देशाबाहेर केली आहे.
कंपनीने संपूर्ण २०१४ या वर्षांत ४.११ लाख विक्रमी विक्री नोंदविली असून प्रवासी वाहन क्षेत्रातील २१.८ टक्के बाजारहिस्सा राखला असल्याची माहिती कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी दिली.
जपानी भागीदारासह भारतीय वाहन क्षेत्रात अस्तित्व असलेल्या टोयोटा किलरेस्कर मोटर्सने डिसेंबरमध्ये ७.९७ टक्के वाढीसह एकूण १३,६२८ वाहनांची विक्री केली आहे, तर स्थानिक बाजारपेठेत कंपनीची वाहने १०.२५ टक्क्य़ांनी वाढून १०,६४८ झाली आहेत. कंपनीने नोव्हेंबर व डिसेंबर अशी दोन्ही महिन्यात वाहन विक्री वाढ राखली आहे.
व्यापारी वाहन निर्मितीतील व्हीई कमर्शिअल व्हेकल्स (आयशर) कंपनीने डिसेंबर २०१४ मध्ये एकूण ३,३८७ वाहनांच्या जोरावर २०.६६ टक्के वाढ नोंदविली आहे. व्होल्वो समूह आणि आयशर मोटर्स भागीदारीतील या कंपनीने स्थानिक बाजारपेठेत २६.६ टक्के वाढ तर ११.५ टक्के निर्यातीत घसरण राखली आहे.
शेव्हर्ले नाममुद्रेसह भारतीय प्रवासी क्षेत्रात आपली वाहने सादर करणाऱ्या जनरल मोटर्सला यंदा मोठय़ा घसरणीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीने ३६.५६ टक्के घसरण नोंदवीत गेल्या महिन्यात अवघ्या ३,६१९ वाहनांची विक्री नोंदविली. वर्षभरापूर्वीच्या डिसेंबर महिन्यात ही संख्या ५ हजाराच्या वर होती.
महिंद्र समूहाने ट्रॅक्टरसह एकूण वाहन विक्रीतही यंदा घसरण नोंदविली आहे. कंपनीची विक्री डिसेंबर २०१४ मध्ये ३६,३२८ झाली. वर्षभरापूर्वी ती जवळपास ४० हजार होती. कंपनीच्या स्पोर्ट युटीलिटी वाहन प्रकाराला यंदा कमी पसंती मिळाल्याचे या क्षेत्रातील अवघ्या ५ टक्के विक्री वाढीवरून लक्षात येते, तर कंपनीच्या व्यापारी वाहनांची विक्रीदेखील १५ टक्क्य़ांनी यंदा रोडावली आहे. निर्यातीतील ३२ टक्के घसरणीलाही कंपनीला या डिसेंबरमध्ये सामोरे जावे लागले. तर एकूण ट्रॅक्टर विक्रीदेखील तब्बल २७ टक्क्य़ांनी घसरली आहे. देशांतर्गत तसेच निर्यातीतही ट्रॅक्टरमध्ये घसरण झाली आहे. मान्सूनचा विलंब, कमी उत्पादन आणि उत्पन्न यामुळे यंदा ट्रॅक्टर या वाहन प्रकारात नकारात्मकता दिसून आल्याचे कंपनीच्या कृषी उपकरण व दुचाकी विभागाचे मुख्य कार्यकारी राजेश जेजुरीकर यांनी म्हटले आहे.
दुचाकीमध्ये रॉयल एनफिल्ड, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर्स यांनीही वर्षांच्या शेवटच्या महिन्यात अधिक विक्री नोंदविली आहे. हीरो मोटोकॉर्पची विक्री वाढ पाव टक्क्य़ापेक्षाही कमीआहे. डिसेंबर २०१३ मध्ये कंपनीने ५.२४ लाख वाहने विकली असताना यंदा ती ५.२६ लाख झाली आहे.
टीव्हीएस मोटर्सच्या दुचाकी विक्रीत २०.३ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने डिसेंबर २०१४ मध्ये १,९१,८८० स्कूटर व मोटरसायकल विकली. यामध्ये स्कूटरची वाढ २५.३३ टक्के तर मोटरसायकलची २१.९ टक्के आहे.
आयशर मोटर्सचाच भाग असलेल्या रॉयल एनफिल्डच्या दुचाकीत तब्बल ४८ टक्के वाढ झाली आहे. कंपनी बुलेट नावाने तिच्या अधिकतर भारदस्त दुचाकी विकते. कंपनीच्या या दुचाकी गेल्या महिन्यात २८ हजारांवर गेल्या असून निर्यातही थेट ८५ टक्क्य़ांनी वाढली आहे.