बँकांच्या कर्ज मागणीत सातत्याने घट होत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात बँकांच्या कर्ज वितरणाच्या वृद्धीदरात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या पाक्षिक आकडेवारीचे विश्लेषण करणारे टिपण पत निर्धारण आणि संशोधन कंपनी ‘केअर’ने प्रकाशित केले आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात कर्ज मागणीत ५.५ लाख कोटींची वाढ झाली असली १० एप्रिल २०२० रोजी संपलेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कर्ज वितरणात घट झाली आहे. सामन्यत: आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकांच्या कर्जाला मागणी नसते. करोना प्रसारामुळे वर्षभर सुरू राहिलेल्या टाळेबंदीसदृश परिस्थितीत त्यात भर पडली आहे.

मागील पाच वर्षांत प्रथमच कर्ज मागणीत घट झाल्याचे आकडेवारीत समोर आले आहे. याच कालावधीत बँकांच्या मुदत ठेवीत १०.९% वाढ दिसून आली. अर्थव्यवस्थेत ६ लाख कोटींची अतिरिक्त रोकड सुलभता आहे. हीच रोकड सुलभता मुदत ठेवीतील वाढीला कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष या अहवालात काढला आहे.