सलग दोन महिन्यांनंतरच्या वाढीनंतर यंदाच्या फेब्रुवारीमध्ये देशाची निर्यात काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या महिन्यात ती २७.६७ अब्ज डॉलर नोंदली गेली असून वार्षिक तुलनेत त्यात ०.२५ टक्के घसरण झाली आहे.

भारताची आयात वर्ष २०२१ च्या दुसऱ्या महिन्यात ६.९८ टक्क्यांनी वाढून ४०.५५ अब्ज डॉलर झाली आहे. परिणामी आयात-निर्यातीतील दरी – व्यापार तूट गेल्या महिन्यात १२.८८ अब्ज डॉलर झाली आहे. फेब्रुवारी २०२० मधील १०.१६ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदात त्यात वाढ झाली आहे.

चालू महिन्यात संपत असलेल्या विद्यमान आर्थिक वर्षांतील आतापर्यंतच्या – एप्रिल २०२० ते फेब्रुवारी दरम्यान निर्यात २५५.९२ अब्ज डॉलर झाली असून ती वार्षिक तुलनेत याच कालावधीपेक्षा १२.३२ टक्क्यांनी कमी आहे. तर या दरम्यान आयात ३४०.८८ अब्ज डॉलर झाली असून त्यातही २३ टक्के घसरण झाली आहे.