देशांतर्गत बाजारपेठेत भारतीय वाहन कंपन्यांची विक्री वाढली असली तरी एकूण २०२० वर्षांत निर्यात लक्षणीय प्रमाणात घसरली असल्याचे निरिक्षण ‘सिआम’ने नोंदविले आहे. देशव्यापी वाहन निर्मात्या संघटनेने, गेल्या वर्षांत वाहन निर्यात १८.८७ टक्क्यांनी घसरल्याचे गुरुवारी जाहीर केले.

देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी नुकतीच स्पष्ट झाली आहे. मात्र गेल्या वर्षांत निर्यातीबाबत वाहन क्षेत्राने निराशाजनक कामगिरी केल्याचे ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) ने म्हटले आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२० दरम्यान भारतातील वाहनांची निर्यात ३८.६५ लाख नोंदली गेली आहे. आधीच्या वर्षांत ही संख्या अधिक, ४७.६३ लाख होती. निर्यात घसरणीत सर्वाधिक फटका अर्थातच प्रवासी वाहन गटाला बसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षांत एकूण प्रवासी वाहनांची ४.२८ लाख निर्यात झाली. यंदा हे प्रमाण ३९.३८ टक्क्यांनी रोडावले आहे. तर या गटातील कारची निर्यात ४७.८९ टक्क्यांनी घसरून २.७९ लाखांवर आली आहे. बहुपयोगी वाहनांची निर्यात १२.६० टक्क्यांनी कमी होत १.४९ लाख झाली आहे.

निर्यात क्षेत्रातील अव्वल गटापैकी दुचाकीची निर्यात १३ टक्क्यांनी यंदा कमी होत ३०.०६ लाख झाली. त्यात स्कूटरमध्ये ३७.२८ टक्के तर मोटरसायकलमध्ये ९.८७ टक्के घसरण झाली आहे. तीनचाकी वाहने तसेच वाणिज्यिक वापरासाठीच्या वाहनांची निर्यातही वर्ष २०२० मध्ये दोन अंकी प्रमाणात कमी झाली आहे.