देशातील व्यापारी बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण मार्च २०१९ अखेर कमी झाले आहे. २०१८-१९ मध्ये बुडीत कर्जे ९.३४ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहेत.

आधीच्या वित्त वर्षांच्या तुलनेत गेल्या वित्त वर्षांत बँकांची अनुत्पादित मालमत्ता १.०२ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मंगळवारी सांगितले.

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सितारामन यांनी सांगितले की, बँकांची अनुत्पादित मालमत्ता निश्चित करून त्याचा तिढा सोडवितानाच बँकांना सरकार भांडवली अर्थसाहाय्य करत आहे.

दिवाळखोरी संहितेंतर्गत बँकांची थकीत कर्जाची समस्या वेगाने सुटत असून कर्जबुडव्या कंपन्यांच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

३१ मार्च २०१९ अखेर बँकांची अनुत्पादित मालमत्ता १,०२,५६२ कोटी रुपयांनी कमी होत ९,३३,६२५ कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. वर्षभरापूर्वी, ३१ मार्च २०१८ पर्यंत ही रक्कम १०,३६,१८७ कोटी रुपये होती, असे सितारामन यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी एका अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, एक लाख रुपयांवरील रकमेच्या बँकेमधील गैरव्यवहार प्रकरणांची सर्वाधिक नोंद ही आयसीआयसीआय बँकेत (३७४) झाली असून कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँकेतही असे प्रकार घडले आहेत.