एल अँड टीच्या आर्मर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्समधून (एएससी) १००व्या के९ वज्रा १५५एमएम/५२ ट्रॅक्ड सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झरला भारतीय लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी गुरुवारी गुजरात राज्यातील सुरतजवळील हाझिरा येथे हिरवा झेंडा दाखवला.

१००व्या हॉवित्झरला झेंडा दाखवण्यासह एल अँड टीने मे २०१७ मध्ये मिळालेल्या सद्य एमओडी कंत्राटाअंतर्गत सर्व हॉवित्झर्रचे वितरण पूर्ण केले आहे. या माध्यमातून गुंतागुंतीच्या मंचाचे वेळेत वितरण करण्याची परंपरा कायम राखली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

कंपनीची कार्यक्रम व्यवस्थापन क्षमता, गुंतागुंतीच्या यंत्रणांचे एकत्रीकरण कौशल्य आणि कंपनीची उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन कौशल्य आणि अंमलबजावणीतील कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण असल्याचे एल अँड टीच्या वतीने नमूद करण्यात आले.

‘मेक इंन इंडिया’ मिशनचा एक भाग म्हणून कंपनीने सुरतजवळील हाझिरा उत्पादन केंद्रामध्ये हरित क्षेत्र उत्पादन, एकत्रिकरण आणि चाचणी सुविधा, आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्सची (एएससी) स्थापना केली. ५१व्या के९ वज्राला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जानेवारी २०२० मध्ये हाझिरा येथून झेंडा दाखवला होता. जानेवारी २०१८ मध्ये नरेंद्र मोदी यांनी हे एएससी राष्ट्राला अर्पण केले होते.

एल अँड टी डिफेन्सने जागतिक स्तरावर झालेल्या स्पर्धातमक बोलीमध्ये मिळवलेले हे कंत्राट कोणत्याही खासगी भारतीय कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेले सर्वात मोठे कंत्राट आहे.

याअंतर्गत कंपनीने ‘के९ वज्रा’ची निर्मिती केली. या प्रक्रियेसाठी एल अँड टी ही सर्वात मोठी बोलीधारक कंपनी होती. तर दक्षिण कोरियातील प्रमुख संरक्षण कंपनी आणि जगातील सर्वात उच्च श्रेणीचे हॉवित्झर ‘के९ थंडर’ची ओईएम उत्पादक असलेल्या हान्व्हा डिफेन्स तिची तंत्रज्ञान भागीदार होती.

लार्सन अँड टुब्रो या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीचे उत्पन्न २१ अब्ज डॉलर असून कंपनी ३० देशांत कार्यरत आहे.

के९ वज्राच्या प्रत्येक यंत्रणेमागे १३,००० प्रकारच्या सुटय़ा भागांच्या स्थानिक निर्मितीचा समावेश असून त्यासाठी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतील पुरवठा साखळीचा वापर करण्यात आला. यामुळे १,००० पेक्षा जास्त सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग भागीदारांच्या पुरवठा साखळीला टिकून राहता येईल. के९ वज्रासारख्या गुंतागुंतीच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन भारतीय अर्थव्यस्थेला विस्तृत प्रमाणात लाभ मिळवून देणारे, रोजगार निर्मिती करणे आणि संरक्षण क्षेत्रासाठी भारतातील उद्योग क्षेत्राची यंत्रणा विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे.

– जे. डी. पाटील, एल अँड टीचे संपूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (संरक्षण आणि स्मार्ट तंत्रज्ञान).