एचडीएफसी समूह अध्यक्ष दीपक पारेख यांचे निदान; बँकांचा रोख बदलल्याचा दावा

निधी उभारणीसाठी कंपन्यांनी आपला मोर्चा रोखे बाजाराकडे वळविल्याने बँकांच्या पतपुरवठय़ातील वाढ खुंटली असल्याचे मत एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केले आहे. औद्योगिक हालचाली मंदावल्याने व्यापारी बँकांचा पतपुरवठा थेट ५ टक्क्यांपर्यंत आल्याचेही ते म्हणाले.

येथे सुरू असलेल्या एका परिषदेच्या मंचावरून पारेख बोलत होते. ते म्हणाले की, कंपन्या, उद्योगांमुळे बँकांची कर्जमागणी मंदावली असली तरी अद्याप ती उणे स्थितीत नाही. मात्र उद्योगही त्यांच्या भांडवल उभारणीसाठी आता रोखे बाजारासारखे पर्याय अनुसरत आहेत. अनेक कंपन्या त्यांच्या मालमत्ता विकून, प्रसंगी थेट विदेशी गुंतवणूक वाढवून आपल्यावरील कर्जभार कमी करत आहेत, असेही ते म्हणाले.

यासाठी त्यांनी एस्सार-रोसनेफ्ट, डीएलएफ-जीआयसी, जीव्हीके-फेअरफॅक्स आदी उदाहरणे दिली. व्यापारी बँकांकडून आकारला जाणारा कर्ज व्याजदर हा रोखे बाजारातील दरांपेक्षा अधिक असल्याने उद्योग या पर्यायाकडे वळत असल्याचे ते म्हणाले. बँकांना वळसा घालून कंपन्या आता हा थेट पर्याय स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकांच्या माध्यमातून उचललेल्या ९८,४४० कोटी रुपयांच्या कर्जाच्या तुलनेत थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे कंपन्यांनी १.८० लाख कोटी रुपयांची रक्कम उभारल्याचे उदाहरण पारेख यांनी या वेळी दिले. पैकी ११,५०० कोटी रुपये हो मसाला बाँडच्या माध्यमातून आले असल्याचेही ते म्हणाले.

ट्रम्पप्रमाणेच संरक्षणात्मक धोरणाची सरकारकडे मागणी

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाप्रमाणे भारतातील उद्योगांनाही सरकारने संरक्षण देण्याची मागणी आघाडीच्या उद्योगधुरीणांनी शुक्रवारी ‘सीआयआय’च्या परिषदेतून केली. भारतीय उद्योग व्यवस्थेचा आकार हा तुलनेत मोठा असून तिचे संरक्षण झाले पाहिजे, असा आग्रह एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी या वेळी धरला. असेच काहीसे मत गोदरेज समूहाचे अध्यक्ष अदि गोदरेज, स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनीही व्यक्त केले. स्वस्त चिनी स्टील आयातीमुळे येथील स्टील उद्योगावर विपरीत परिणाम झाल्याचा दाखला या वेळी उद्योजकांकडून देण्यात आला.