‘मंगलोर केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायजर्स’मधील आपली हिस्सेदारी वाढविण्यासाठी स्पर्धक कंपन्यांनी बोलीचा दरही वाढविला आहे. कंपनीतील अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदीची प्रक्रिया चार दिवसांवर येऊन ठेपली असताना दीपक फर्टिलायजर्स व झुआरी समूहाने प्रति समभाग देकार थेट ९४ रुपयांवर नेऊन ठेवला आहे.
दोनच दिवसांपूर्वी दीपक फर्टिलायजर्सने ६३ रुपये, तर झुआरी समूहाने ६८ रुपये दराने मंगलोर केमिकल्समधील समभाग खरेदीची (ओपन ऑफर) तयारी दर्शविली होती. उभय कंपन्यांनी आता हा दर अनुक्रमे ९३.६० व ८१.६० रुपयांवर नेला आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत मोजली जाणारी रक्कमही वाढणार आहे.
मंगलोर केमिकल्समध्ये तूर्त २५.३१ व १६.४३ टक्के हिस्सा असणाऱ्या अनुक्रमे दीपक फर्टिलायजर्स व झुआरी समूहाने शुक्रवारी फेरखरेदीची प्रक्रिया जाहीर केली. येत्या १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू राहील. झुआरीसोबत विद्यमान भागीदार यूबी समूह आहे. विजय मल्या यांच्या यूबी समूहाचा हिस्सा २१.९७ टक्के आहे. दीपक फर्टिलायजर्सने यापूर्वी प्रति समभाग ६३ रुपये तर झुआरी समूहाने ६८.५५ रुपये दराने खरेदीची तयारी दर्शविली होती. यासाठी उभय कंपन्यांना अनुक्रमे १९४ कोटी रुपये व २११.२२ कोटी रुपये लागणार होते. दरम्यान, शुक्रवारच्या नव्या घडामोडीने मंगलोर केमिकल्सचा भाव १९.९५ टक्क्यांनी वधारत ८८.१० रुपये या वार्षिकांकावर पोहोचला.
कंपन्याही ‘उणे’तून बाहेर
मुंबई : भारताला गुंतवणूकपूरक दर्जा देणाऱ्या ‘स्टॅन्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ने देशातील काही कंपन्यांचेही पतमानांकन उंचावले आहे. यामध्ये टाटा आणि अंबानी समूहातील कंपन्यांसह अनेक सार्वजनिक कंपन्यांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस (खासगी कंपन्या), ओएनजीसी, एनटीपीसी, एनएचपीसी, पीजीसीआयएल (सार्वजनिक कंपन्या), एक्झिम बँक, आयआयएफसी, आयआरएफसी, पीएफसी (सार्वजनिक उपक्रम) या कंपन्यांचे पतमानांकन उणे स्थितीतून स्थिर टप्प्यावर आणले आहे. पतमानांकन उंचावण्यात आलेली टाटा समूहातील टीसीएस ही दुसरी कंपनी आहे. ‘मूडिज’ या अन्य एका आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने समूहातील सहा कंपन्यांचे पतमानांकन गेल्याच आठवडय़ात उंचावले होते. देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेबाबत मात्र ‘एस अ‍ॅण्ड पी’ने कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. वाढत्या बुडीत कर्जापोटी दोन वर्षांपूर्वी बँकेचे पतमानांकन उणे करण्यात आले होते.