मुंबई : व्यवसाय कर अधिनियमानुसार मुदतीनंतर तीस दिवसांच्या आत विवरणपत्र दाखल करणाऱ्या नियोक्त्यास एक हजाराऐवजी आता केवळ दोनशे रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच वजावट नाकारलेल्या व्यापाऱ्यास आता चूक दुरुस्तीसाठी निर्धारण अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करता येणार आहे. या संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्यांवरील कर अधिनियम-१९७५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यानुसार व्यवसाय कर अधिनियमातील कलम ६(३) नुसार नियोक्त्याने एक दिवसही उशिरा विवरणपत्र दाखल केल्यास त्यास विलंब शुल्काचा एक हजार रुपये भरणा केल्यानंतरच विवरणपत्र दाखल करता येत असे. आता त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नियोक्त्याने विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीनंतर ३० दिवसांच्या आत विवरणपत्र दाखल केल्यास त्यास केवळ २०० रुपये इतके विलंब शुल्क भरावे लागणार आहे.