News Flash

‘एअरटेल’वर र्निबध

भारती एअरटेलला परवाना नसलेल्या सात परिमंडळांत नव्या ग्राहकांना थ्रीजी सेवा बहाल करण्यापासून प्रतिबंध करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीत दिला. आजवर परवाना नसलेल्या क्षेत्रात

| April 12, 2013 12:35 pm

भारती एअरटेलला परवाना नसलेल्या सात परिमंडळांत नव्या ग्राहकांना थ्रीजी सेवा बहाल करण्यापासून प्रतिबंध करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीत दिला. आजवर परवाना नसलेल्या क्षेत्रात थ्रीजी सेवा बेकायदेशीर बहाल केल्याप्रकरणी आकारल्या गेलेल्या वाढीव दंडाच्या रकमेबाबतही कंपनीला कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दर्शविला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अल्तमास कबीर आणि न्या. विक्रमजीत सेन यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशान्वये कोलकाता, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र (मुंबई वगळता), उत्तर प्रदेश आणि केरळ या सात परवाना नसलेल्या क्षेत्रांत एअरटेल थ्रीजी सेवेसाठी नव्याने ग्राहक नोंदविता येणार नाहीत. सदर आदेश हा केवळ एअरटेल संबंधाने असला तरी त्याचा दणका एअरटेलप्रमाणेच परवानाबाह्य़ क्षेत्रात थ्रीजी सेवा बहाल करणाऱ्या आणि त्यापायी दूरसंचार विभागाच्या दंडात्मक कारवाईला पात्र ठरलेल्या व्होडाफोन आणि आयडिया या अन्य सेवा प्रदात्यांनाही बसणार आहे. न्यायालयाने व्होडाफोन आणि आयडिया यांनाही या प्रकरणात पक्षकार म्हणून सामील करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरात परवाना प्राप्त नसलेल्या सात क्षेत्रांत थ्रीजी रोमिंग सेवा बहाल करीत असल्याबद्दल भारती एअरटेलवर रु. ३५० कोटींच्या (प्रत्येक परिमंडळागणिक रु. ५० कोटीप्रमाणे) दंडाची नोटीस केंद्रीय दूरसंचार विभागाने १५ मार्च रोजी बजावली. त्याविरोधात एअरटेलची याचिका मंजूर करीत दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने १८ मार्च रोजी स्थगिती आदेश बजावला. मात्र त्याला हरकत घेणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाने ४ एप्रिल रोजी एकसदस्यीय पीठाचा स्थगिती आदेश रद्दबातल ठरविणारा निर्णय दिला. तथापि भारती एअरटेलने या विभागीय पीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठापुढील न्यायिक प्रकरणात पक्षकार नसलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सची याचिका मुळात दाखल करून घेणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद एअरटेलने आपल्या याचिकेत केला होता. देशभरात थ्रीजी स्पेक्ट्रम मिळविण्यासाठी रिलायन्सने हजारो कोटी खर्च केले असताना, एअरटेल व अन्य सेवा प्रदाते मात्र त्याचा उपभोग विविध परिमंडळांमध्ये गेली दोन वर्षे विनामूल्य घेत आहेत. या बेकायदा कृत्याबद्दल एअरटेलला दंड आकारण्यात आला तरी त्यातून सर्वाधिक आर्थिक नुकसान हे रिलायन्स कम्युनिकेशन्सलाच सोसावे लागले. त्यामुळे या संबंधीच्या न्यायिक प्रकरणात ती एक पक्षकार नैसर्गिकपणेच ठरते, असा युक्तिवाद रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून करण्यात आला.

दणका कुणाला?
भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर या आघाडीच्या तीन सेवाप्रदात्यांपैकी कुणीही २०१० साली झालेल्या थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावात अखिल भारतीय स्तरावरील परवाना मिळविला नसल्याने उभयतांनी परवानाबाह्य़ क्षेत्रात जाणाऱ्या आपापल्या ग्राहकांना रोमिंग सुविधा देण्याकरिता परस्पर सामंजस्य केले. पण या सेवा प्रदात्यांनी परवानाप्राप्त नसलेल्या क्षेत्रांत ग्राहक नोंदणी सुरू ठेवली, जो उघडपणे नियमभंग असल्याचे ठरवून मार्चमध्ये दूरसंचार विभागाने या  बेकायदेशीर कृत्याबद्दल भारती एअरटेलसह, व्होडाफोन (रु. ५५० कोटी) आणि आयडिया सेल्युलर (रु. ३०० कोटी) या अन्य प्रदात्यांवर दंडाची नोटीस बजावली. भारती एअरटेलबाबत ही दंडात्मक कारवाई योग्य ठरविणारा आणि परवानाबाह्य़ क्षेत्रात थ्रीजी ग्राहक मिळविण्यास प्रतिबंध करणारा हा निकाल असला तरी तो अशाच कृत्यासाठी दोषी ठरविलेल्या व्होडाफोन आणि आयडियालाही लागू होईल. या तिन्ही सेवांचे देशभरात एकूण १२० लाख थ्रीजी ग्राहक असून, भारती एअरटेलचा त्यात सर्वाधिक ६८ लाखांचा वाटा आहे.

लाभार्थी कोण?
मुकेश अंबानी यांची रिलायन्स इन्फोकॉम ही २०१० सालात संपूर्ण देशस्तरावर थ्रीजी सेवा परवाना मिळविणारी एकमेव कंपनी आहे. जरी सरकारने आघाडीच्या तीन प्रदात्यांमधील रोमिंग सहकार्य करार सुरू ठेवण्यास मंजुरी दिली तरी न्यायालयाच्या ताज्या निकालाने या कंपन्यांना देशस्तरावर नवीन ग्राहक नोंदविण्यावर मर्यादा येणार आहे. त्याउलट रिलायन्स जिओ हा अंबानींचा नवीन उपक्रम लवकरच फोरजी सेवा सुरू करीत आहे, न्यायालयाचा ताजा निकाल या शुभारंभाला बळ प्रदान करणाराच ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 12:35 pm

Web Title: delhi hc vacates stay order on airtels 3g roaming ban
टॅग : Business News
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’कडून १२८ अंश वाढीची गुढी
2 श.. शेअर बाजाराचा : शेअर सर्टिफिकेट्स ते डिमॅट संक्रमण
3 टाटा स्टीलमध्ये टाटा मेटॅलिक्स व अन्य उपकंपनीचे विलिनीकरण
Just Now!
X