तिमाही सोने मागणीत ९ टक्के घसरण; २०१७ सालात आठ वर्षांचा नीचांक गाठण्याची शक्यता

भारताची सोने मागणी सलग तिसऱ्या तिमाहीत घसरली आहे. वस्तू व सेवा कर तसेच काळा पैसा विरोधी नियमांची अंमलबजावणी यामुळे भारताची सोने मागणी तिसऱ्या तिमाहीत २४ टक्क्यांनी घसरून १४५.९ टन झाली आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील मौल्यवान धातूचा आढावा घेताना याबाबतचा सविस्तर अहवाल गुरुवारी जाहीर केला. यामध्ये सराफांनी गेल्या तिमाहीत सोने-चांदीकरिता कमी मागणी नोंदविल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वर्षभरापूर्वीच्या तिसऱ्या तिमाहीत देशाची सोने मागणी १९३ टन होती. किमतीच्या प्रमाणात ती वार्षिक तुलनेत ३० टक्क्यांनी रोडावत ३८.५४० कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१६ दरम्यान सोने मागणी ५५,३९० कोटी रुपये होती. यानंतर महिन्याभराने नोटाबंदी लागू झाली होती.

गेल्या तिमाहीत दागिन्यांसाठीची मागणी २५ टक्क्यांनी कमी होत ती ११४.९ टन नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत दागिने मागणी १५२.७ टनची होती. तर मूल्याच्या बाबतीत दागिने मागणी ३१ टक्क्यांनी कमी होत ३०,३४० कोटी रुपयांवर नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी या कालावधीदरम्यान ४३,८८० कोटी रुपयांची दागिने मागणी नोंदविली गेली होती.

मौल्यवान धातूतील तिसऱ्या तिमाहीतील एकूण गुंतवणूकही कमी होत ती वर्षभरापूर्वीच्या ४०.१ टनवरून ३१ टनवर आली आहे. यात यंदा २३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मूल्याच्या बाबतीत २९ टक्क्यांनी कमी होत ती ११,५२० कोटी रुपयांवरून ८,२०० कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.

देशातील सोन्याच्या पुनर्वापराचे प्रमाण किरकोळ कमी होत ते २५.७ टन झाले आहे.

सण समारंभ तसेच लग्नादी मुहूर्त यामुळे देशाची सोने धातू मागणी चौथ्या तिमाहीत वाढण्याची शक्यता या पाश्र्वभूमीवर जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण २०१७ वर्षांकरिता भारताची सोने मागणी ६५० ते ७५० टन राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

चीननंतर भारत हा सोने मागणी नोंदविणारा जागतिक स्तरावरील दुसरा मोठा देश आहे. देशाची मौल्यवान धातू  मागणी सरासरी वार्षिक ८०० ते १,००० टनपर्यंतची आहे. २०१८ साली ती ८०० टनच्या पुढे नोंदली जाण्याची आशा आहे. ५०,००० रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या दागिने खरेदीकरिता अनिवार्य करण्यात आलेल्या पॅनची मर्यादा आता २ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

जागतिक स्तरावरही मागणी लक्षणीय घट

भारतातील निराशाजनक वातावरण तसेच अमेरिकेतील गुंतवणूकदारांचा काढता पाय यामुळे जागतिक स्तरावरही सोने मागणीत घट दिसून आली आहे. २०१७ च्या जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने मागणी ९ टक्क्यांनी कमी होत ९१५ टनपर्यंत येऊन ठेपली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी जागतिक स्तरावर ३ टक्क्यांनी कमी होत ४७९ टन झाली आहे. चीनमधील चनल अवमूल्यनामुळे सोन्याचे बार तसेच नाण्यांसाठीची मागणी मात्र १७ टक्क्यांनी वाढली आहे. मौल्यवान धातू उत्पादन आंतरराष्ट्रीय स्तरावर एक टक्क्याने खाली आले आहे.

जुलैपासूनच लागू झालेली वस्तू व सेवा करप्रणाली तसेच देशात अस्तित्वात आलेल्या काळा पैसा विरोधी विधेयकामुळे भारताची एकूणच सोने मागणी यंदाच्या तिमाहीत कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. सलग तिसऱ्या तिमाहीत त्यात घसरण नोंदली गेली आहे. दागिने तसेच नाणी आणि गुंतवणुकीतील प्रमाण दुहेरी अंकाने खाली आले आहे.    – सोमसुंदरम पीआर, व्यवस्थापकीय संचालक (भारत), जागतिक सुवर्ण परिषद