पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या देशभरात १०० स्मार्ट शहरे उभारण्याच्या आणि ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांनी जगभरातील तंत्रज्ञान पुरवठादारांना मोठय़ा संधींची दालने खुली केली असून, जागतिक आघाडीच्या ११० तंत्रज्ञान व उपकरण कंपन्या या उपलब्ध होऊ पाहणाऱ्या बाजारपेठेकडे आशेने पाहत आहेत.
चैन-ऐषाराम, मनोरंजन ते उत्पादनक्षमतेत गती आणि कार्यप्रणाली प्रभावी बनविण्यासाठी वापरात येणाऱ्या अत्याधुनिक साधनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रो ऑडियो-व्हिज्युअल (एव्ही) उद्योगाला येत्या काळात भारताच्या वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षेच्या उपाययोजना, संरक्षण क्षेत्र, शिक्षण, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य सेवा आणि मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांत मोठय़ा संधी आहेत. मोदी सरकारच्या १०० स्मार्ट शहरांच्या नियोजनाने त्याला आणखीच चालना मिळेल, असे प्रतिपादन प्रो एव्ही उद्योगाचा महासंघ ‘इन्फोकॉम एशिया पीटीई लि.’चे कार्यकारी संचालक रिचर्ड टॅन यांनी केले.
आजच्या घडीला आशिया-पॅसिफिक क्षेत्रात चीनलाही मागे टाकून भारत हे सर्वात वेगाने विकसित होत असलेली अत्याधुनिक ध्वनी-चित्र साधनांची बाजारपेठ असून, २०१२ मधील २४० कोटी अमेरिकी डॉलरवरून ती २०१६ पर्यंत दुपटीने वाढून २९० कोटी डॉलरवर जाण्याचे अंदाज आहेत. गेल्या काही वर्षांत वार्षिक सरासरी २० टक्के दराने या बाजारपेठेचा विकास अचंबित करणारा असल्याचे टॅन यांनी मत व्यक्त केले. १७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे आगामी तीन दिवस मुंबईत होत असलेल्या ‘इन्फोकॉम इंडिया २०१४’ प्रदर्शनातून स्मार्ट शहरांच्या वापरासाठी आवश्यक साधनांच्या निर्मात्या ११० जागतिक आघाडीच्या कंपन्या प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने एकत्र येऊन आपल्या कल्पक तंत्रज्ञानाचा परिचय करून देणार आहेत.
प्रत्येक देशाची त्यांच्या स्मार्ट शहराबद्दलची संकल्पना वेगवेगळी असते. तरी सुनियोजित पायाभूत सुविधा, कार्यक्षम, टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही इमारती, पाणी, गॅस, वीज, वाहतुकीच्या सोयी, आपत्कालीन सेवा, सार्वजनिक सेवा आदी सर्व तांत्रिकदृष्टय़ा एकजीव बनणे हा स्मार्ट शहरांचा अविभाज्य ऐवज असायलाच हवा, अशी टॅन यांनी पुस्ती जोडली.
मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनात सोनी, क्रिस्टी, बेन्क्यू, पॅनासॉनिक, कॅसिओ, क्रेस्टॉन एशिया, हिताची होम इलेक्ट्रॉनिक्स, क्रॅमर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे कंपन्या सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या इलेक्ट्रॉनिक्सची भारतात आयात होत असली तरी येत्या काळात सहा-सात आंतरराष्ट्रीय उत्पादक भारतात उत्पादन सुविधा स्थापण्याच्याही विचारात असून, हे प्रदर्शन त्या दिशेने चालनेचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात होत असलेल्या या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत नोंदणीपश्चात सर्वासाठी प्रवेश खुला असेल.