प्रचंड प्रमाणातील अनिश्चितता आणि शॉपिंग सेंटर उद्योगाला काही भागांमध्ये असलेला काही प्रमाणातील दिलासा यामुळे ‘शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एससीएआय) हरित क्षेत्रातही मॉल सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आणि दिशानिर्देशांसह महाराष्ट्र शासनाकडे धाव घेतली आहे.

सध्या ज्यांना शिथिलता देण्यात आली आहे त्यापेक्षा ‘शॉपिंग सेंटर’ (मॉल) अधिक कार्यक्षमतेने सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करू शकते, असा दावाही यानिमित्ताने करण्यात आला आहे.

याबाबतच ‘एससीएआय’ने उद्योग जगत आणि अधिकाऱ्यांशी प्रमाणात चर्चा केली असून कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात वापरण्यात येत असलेल्या उत्तम उपाययोजनांचा अवलंब केला असल्याचे सांगण्यात आले.

मद्यविक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात लोकांनी लावलेल्या रांगांचा आणि त्यात सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्याच्या दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याच्या अहवालांचे उदाहरण देत ‘एससीएआय’ने कडक प्रक्रिया अंमलबजावणीची गरज मांडली आहे. शिवाय सुरक्षित सामाजिक अंतर पाळण्यासह सुरक्षित व स्वच्छ वातावरण ठेवले जाईल, याची खात्री देऊ केली आहे.

सरकार या उद्योग क्षेत्राची विनंती लक्षात घेईल आणि संघटित विक्री उद्योगाचे भविष्य अनिश्चित असल्याने १.२० कोटी रोजगाराच्या बचावासाठी सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विक्री उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत १० टक्के योगदान देते. तर कृषीनंतर सर्वाधिक योगदान देणारे हे क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात ८ टक्के कष्टकरी असल्याने कर्मचारी संख्येच्या दृष्टीने विचार करता रोजगार देणारे हे देशातील तिसरे मोठे क्षेत्र आहे.

‘एससीएआय’चे अध्यक्ष अमिताभ तनेजा म्हणाले, देशातील संघटित विक्री उद्योग टिकून राहावा आणि दीर्घकाळासाठी शाश्वत राहावा यासाठी सरकार आणि वित्तीय संस्थांनी सुनियोजित प्रयत्न करण्याची गरज आहे. टाळेबंदीमधून बाहेर पडण्यासाठीचे विकेंद्रित धोरण निश्चित दिशानिर्देशांवर आधारित असून त्याने अर्थव्यवस्थेच्या उभारीला मदत मिळणार आहे. उद्योग म्हणून देशभरातील १.२० कोटी रोजगारासाठी आम्ही जबाबदार आहोत आणि रोजगार वाचवता येऊ  शकतात, असेही तनेजा म्हणाले.

विश्वास निर्माण करण्यासाठी ‘एससीएआय’मध्ये सिलेक्ट ग्रुपचे अध्यक्ष अर्जुन शर्मा, नेक्सस मॉलचे मुख्याधिकारी दलिप सेहगल, अंबुजा निओटिया ग्रुपचे अध्यक्ष हर्षवर्धन निओटिया आणि प्रेस्टिज ग्रुप अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इरफान रझ्झाक यांच्यासोबत नुकताच एक ‘वेबिनार’ आयोजित केला होता.

‘फिनिक्स मिल्स’चे व्यवस्थापकीय संचालक अतुल रुईया म्हणाले, मर्यादित वेळ, सामाजिक अंतर, सिनेमागृहांमध्ये दोन प्रेक्षकांमध्ये मोकळ्या खुच्र्या ठेवणे, रेस्तराँमध्ये ग्राहकांमध्ये विभागणी टाकणे, सॅनिटायझर आणि तापमान मोजण्याची व्यवस्था ठेवणे आदी करू शकतो.