नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या ९७ टक्के जुन्या नोटांची ३० डिसेंबरपर्यंत ‘बँकवापसी’ झाल्याचे वृत्त अलिकडेच रिझर्व्ह बँकेने फेटाळले होते, मात्र, आता रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, हे वृत्त खरे ठरल्याचे संकेत मिळत आहेत. रिझर्व्ह बँकेकडून नुकतीच अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर केवळ ५४ हजार कोटींच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ९७ टक्के जुन्या नोटा बँकींग व्यवस्थेत परत आल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या नोटा किती प्रमाणात बँकींग व्यवस्थेत परत आल्या आहेत, याबाबतची शेवटची माहिती रिझर्व्ह बँकेने १९ डिसेंबरला दिली होती. मात्र किती प्रमाणात नोटा चलनात आणल्या आहेत, याची माहिती देण्यात आली नव्हती. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी, याबाबत नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. ६ जानेवारीपर्यंत एकूण ८.९८ लाख कोटी रुपयांचे चलन पुरवण्यात आले आहे. त्यात नव्याने चलनात आणलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांव्यतिरिक्त १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे. याशिवाय अद्याप बँकींग व्यवस्थेत परत न आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांचाही समावेश आहे. ‘ब्लूमबर्ग’ने ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ९७ टक्के जुन्या नोटा बँकींग व्यवस्थेत आल्याचे म्हटले होते. मात्र, रिझर्व्ह बँकेने ते वृत्त खोडून काढले होते. बँकवापसी झालेल्या नोटांची पुन्हा मोजणी करावी लागेल, असे या वृत्तानंतर रिझर्व्ह बँकेने म्हटले होते.

दरम्यान, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरला ५०० रुपयांच्या १ लाख १६ हजार ९८९ नोटा चलनात होत्या. तर १००० रुपयांच्या ४६,७४१ कोटी नोटा बाजारात होत्या. या नोटांचे एकूण मूल्य १५. ४४ लाख कोटी रुपये होते. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेत ८६ टक्के जुन्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँकेकडून ४ नोव्हेंबरला जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण १७.९५ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्या. याशिवाय रिझर्व्ह बँकेकडून ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या. १८ नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण १४.२७ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यात २.५१ लाख कोटी रुपयांच्या कमी मूल्याच्या नोटाही होत्या. याशिवाय नव्याने चलनात आणलेल्या नोटा आणि बंदी घातलेल्या नोटांचाही समावेश होता. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून नव्या नोटांची आकडेवारी स्पष्टपणे सांगण्यात आलेली नाही.

रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा ७ डिसेंबरला पत्रकार परिषदेत नव्या नोटांची आकडेवारी जाहीर केली होती. डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांच्या माहितीनुसार, ६ डिसेंबरपर्यंत एकूण ४ लाख कोटी रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. त्यात १.०६ लाख कोटी रुपये १०० आणि त्याहून कमी मूल्याच्या नोटा होत्या. तसेच २.९४ लाख कोटी रुपये ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा होत्या. त्यानंतर ९ डिसेंबरला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण ९.८१ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यात २.५१ लाख कोटी रुपयांच्या कमी मूल्याच्या नोटा होत्या. त्या ८ नोव्हेंबरपूर्वीच्या होत्या. तसेच १.०६ लाख कोटी रुपयांच्या नवीन नोटा होत्या. तर दुसरीकडे २.९४ कोटी रुपयांच्या ५०० आणि २००० च्या नोटांचा समावेश होता. याचाच अर्थ ९ डिसेंबरपर्यंत रिझर्व्ह बँकेकडे फक्त ३.२९ लाख कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा परत येणे बाकी होते. म्हणजेच, एकूण १५.४४ लाख कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांपैकी १२.४४ लाख कोटींच्या नोटांची ‘बँकवापसी’ झाली नव्हती. विशेष म्हणजे, १३ डिसेंबरला रिझर्व्ह बँकेने प्रसारमाध्यमांना याबाबत माहितीही दिली होती.