नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या किती नोटा जमा झाल्या याची अधिकृत माहिती ८ महिने उलटूनही देण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांपासून सर्वोच्च न्यायालयही हैराण होते. पण आता याचे उत्तर मिळाले आहे. जवळपास ९९ टक्के १००० रुपयांच्या नोटा बँकेत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

वृत्तानुसार, मार्च २०१७ पर्यंत ८,९२५ कोटींच्या १००० रुपयांच्या नोटा वितरणात होत्या. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, वितरणात असलेल्या नोटा म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या बाहेर असलेल्या नोटा होय. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ३ फेब्रुवारी रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरपर्यंत ६.८६ कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या १००० रुपयांच्या नोटा वितरणात होत्या. मार्च २०१७ पर्यंत व्यवहारात असलेल्या १००० हजारांच्या नोटांचे प्रमाण १.३ टक्के होते. याचाच अर्थ ९८.७ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या होत्या.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १००० रुपयांप्रमाणेच चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या नोटाही बँकांमध्ये जमा झाल्या असतील. याचाच अर्थ नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेरच आला नाही, असे जेएनयूतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सुरजीत मुजुमदार यांनी सांगितले. नोटाबंदीच्या काळात १५.४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यात १००० रुपयांच्या ४४ टक्के आणि ५६ टक्के ५०० रुपयांच्या नोटा होत्या. दरम्यान, रिझर्व्ह बँक अद्याप बँकेत जमा झालेल्या नोटांची मोजणी करत आहे. त्यामुळे मोजणी पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागू शकतो, असे सरकारतर्फे जूनमध्ये सांगण्यात आले होते.