पहिल्या १० महिन्यात १.१६ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक

निश्चलनीकरणाला वर्ष पूर्ण होत असताना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा  लक्षणीय वाढलेला ओघ हे सद्यकाळातील सर्वात सकारात्मक वैशिष्टय़ ठरले आहे. एकूण भांडवली बाजारातील तेजी आणि अर्थसाक्षरतेच्या दृष्टीने वाढलेल्या प्रचार -प्रसारासह,  निश्चलनीकरणासह अन्य अनेक घटकांचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निर्देशांक रोज नवीन उच्चांक प्रस्थापित करत असतानाच, समभाग गुंतवणुकीबाबत लोकांची आस्था, अपेक्षा व विश्वास वाढला आहे. अर्थातच म्युच्युअल फंडांमार्फत बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, २०१७ सालाच्या पहिल्या १० महिन्यात १.१६ लाख कोटींची म्युच्युअल फंडात नक्त गुंतवणूक झाल्याचे दिसून येत आहे. ही वार्षिक वाढ अभूतपूर्व असून, गेले अनेक महिने सुरू राहिलेल्या क्रमानुसार सरलेल्या ऑक्टोबरमध्येही १६,००२ कोटी गुंतवणुकीची म्युच्युअल फंडात भर पडल्याचे दिसले आहे.

आधीच्या, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमधील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी असले, तरी मागील वर्षभरातील सरासरीपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक म्युच्युअल फंडात झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरातील आकडेवारीचा विचार केल्यास ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने सर्वाधिक २०,०००चा टप्पा पार केल्याचे दिसून आले आहे.

सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांच्या भांडवली पुनर्भरणाची आणि रस्ते बांधकाम क्षेत्रासाठी मोठी तरतूद केल्याची घोषणा ऑक्टोबरमध्ये केल्यानंतर बाजारात तेजीची नवीन लाट आल्याचे दिसून आले आहे. निर्देशांक नवीन उच्चांक प्रस्थापित करत असतानासुद्धा म्युच्युअल फंडात निधीचा ओघ कमी झालेला नाही. निश्चलनीकरणानंतर जसा पुनर्चलनीकरणाला वेग आला, तसा  नवीन वर्षांत म्युच्युअल फंडात निधीचा ओघ वाढू लागला. म्युच्युअल फंडातील वाढत्या ओघामुळे फंडाच्या निधी व्यवस्थापकांच्या शेअर बाजारात खरेदीतही वाढ झालेली दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडांनी ९,००० कोटींची समभाग खरेदी केली, तर म्युच्युअल फंडांनी जानेवारीपासून ९५,५०० कोटींची खरेदी केल्याचे दिसून येत आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार समभाग विकत असताना स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला आहे. परिणामी ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणुकीत ५.५ टक्के वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडाच्या एकूण गुंतवणुकीने २१ लाख कोटींचा टप्पा पार केला असतानाच समभाग गुंतवणूक ७.५० लाख कोटींवर पोहचली असल्याचे म्युच्युअल फंडाची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत दिसून आले आहे. ‘२०११-२०१२ मध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणुकीपेक्षा गुंतवणूक काढून घेतल्याचे वर्ष होते. गुंतवणूकदारांनी २०१३ मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये हळूहळू गुंतवणुकीकरिता सुरुवात केली. २०१३-२०१४ मध्ये निधीचा ओघ वाढल्याचे दिसून आले. केंद्रात सत्तापालट झाल्यावर समभाग गुंतवणुकीला नक्कीच चांगले दिवस आल्याचे दिसून येते. सरकारच्या वाढत्या आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूकदारांचा समभाग गुंतवणुकीवरील विश्वास अधिक दृढ झाला’, असे प्रुडंट कॉपरेरेट सव्‍‌र्हिसेसच्या अभिषेक मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘वाढत्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीची अनेक करणे सांगता येतील. रोखीने व्यवहार करण्याचा मार्ग निश्चलनीकरणानंतर जवळजवळ बंद झाला. स्थावर मालमत्ता या रोकड सुलभ नाहीत हे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. म्युच्युअल फंड या उद्योगावर सेबीचे नियंत्रण आहे हे लोकांच्या लक्षात आले. निश्चलनीकरणामुळे बँकांच्या ठेवीत वाढ झाल्यामुळे बँकांनी मुदत ठेवींचे दर कमी केले. परिणामी ठेवीदारांचा मोठा वर्ग म्युच्युअल फंडकडे वळला’, असे ‘असेट व्हिला’च्या जयप्रकाश मौर्या यांनी सांगितले.

वाढीची मात्रा सुस्पष्टच..

* ऑक्टोबर २०१७ पर्यंत १० महिन्यांत १.१६ लाख कोटी रु.

* ऑक्टोबर महिन्यांत १६,००० कोटींच्या गुंतवणुकीची भर

* ‘एसआयपी’ गुंतवणूक खातेदारांच्या प्रमाणात १५ टक्के वाढ

* सरासरी ‘एसआयपी’ गुंतवणूक मात्रेत २४ टक्के वाढ