डेन ब्रॉडबँड प्रा. लिमिटेडने वेगवान इंटरनेट सेवेचे देशभरातील १०० शहरांमध्ये विस्तारीकरण हाती घेतले आहे. पाच शहरातील चाचणीला मिळालेल्या उत्साहजनक प्रतिसादानंतर डेनने पहिल्या टप्प्यातील १५ शहरांमधील विस्तारीकरण आधीच सुरू केले आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर डेन ब्रॉडबँड एक कोटींहून अधिक भारतीय घरांना ब्रॉडबँड सुविधा पुरवू शकेल.

देशात इंटरनेटच्या वापरात होत असलेल्या प्रचंड वाढीला ध्यानात घेऊन डेनने २०२० पर्यंत विस्तारीकरणाची ही आक्रमक योजना आखली आहे. या तीन वर्षांत कंपनीकडून साधारण १०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. तीन वर्षांपश्चात देशभरातील ५०० हून अधिक शहरांतील ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचण्याचा डेनचा मानस आहे. सध्या महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, उत्तराखंड अशा १३ महत्त्वाच्या राज्यांमध्ये डेनच्या फायबर केबलच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असून, या माध्यमातून १३ दशलक्ष ग्राहक तिने जोडले आहेत. डेनकडून वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानातून तिच्या ब्रॉडबँडधारकांना २० एमबीपीएस ते १ जीबीपीएसचा डाऊनलोड वेग मिळविता येतो.

वेगवान इंटरनेटची अजूनही वानवा

देशातील डेटाचा वापर वार्षिक पातळीवर १४४ टक्कय़ांनी वाढला असून ४ जी सेवेत प्रति व्यक्ती सरासरी डेटा वापर महिन्याला ११ जीबीपर्यंत पोहोचला आहे. डेटा वापरण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्या तुलनेत गतिमानता वाढलेली नाही. सरासरी २०.७२ एमबीपीएसच्या वेगासह फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या जागतिक क्रमवारीत भारत ६७व्या स्थानी आहेत. मोबाइल ब्रॉडबँड वेगाबाबत हे स्थान १०९ व्या पायरीवर असून यात सरासरी ९.०१ एमबीपीएस वेग मिळतो. देशातील केवळ सहा टक्के घरांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट जोडणी आहे, तर विकसित देशांमध्ये हेच प्रमाण ७० टक्के आहे.